धाराशिव – समय सारथी
भूम, परांडा, वाशी मतदारसंघात विकासनिधीचे समान वाटप आणि दुष्काळग्रस्त परिस्थितीबाबत तातडीने पाठपुरावा करण्याचे निर्देश आमदार प्रा डॉ तानाजीराव सावंत यांनी पुणे येथे घेतलेल्या एका बैठकीत दिले. यावेळी जिल्हा परिषद गटनेते विकी चव्हाण यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थितीत होते.
आमदार निधी किंवा विकासनिधी असो, जिल्हा परिषद असो वा राज्यस्तरीय विविध योजना आणि इतर मंत्रालयांच्या माध्यमातून येणारा निधी, भूम-परांडा-वाशी मतदारसंघातील 13 जिल्हा परिषद गट आणि 3 नगरपालिका अशा सर्व भागांत समान वाटप करण्यात यावा असे स्पष्ट निर्देश आमदार प्रा. डॉ. तानाजीराव सावंत यांनी दिले. याचबरोबर विकासकामांच्या निकडीनुसार सर्वानुमते कामांच्या याद्या तयार करून निधी वितरित करण्यावर भर देण्यात आला.
मतदारसंघातील सर्व पदाधिकारी, प्रमुख कार्यकर्ते, विद्यमान पंचायत समिती व जिल्हा परिषद सदस्य, नगरसेवक, नगराध्यक्ष, पंचायत समिती सभापती आणि उपसभापती यांच्या प्रमुख उपस्थितीत नुकतीच एक विशेष बैठक पार पडली. या बैठकीत विकास निधी बाबत सकारात्मक चर्चा करण्यात आली असून, विकास कामांच्या बाबतीत सर्वांचे धोरण सकारात्मक असावे आणि निधी वाटपावर सविस्तर चर्चा होऊन लवकरच सर्व विकासकामांना प्रत्यक्षात सुरुवात केली जाईल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला. याचबरोबर, आगामी ग्रामपंचायत निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शंभर टक्के सर्व ग्रामपंचायतींवर भगवा फडकवण्याच्या दृष्टीने सर्वांनी आतापासूनच तयारीला लागण्याचे आवाहनही यावेळी करण्यात आले.
दुष्काळी परिस्थिती आणि शेतकऱ्यांच्या मदतीसाठी शासनाकडे विशेष पॅकेजची मागणी करण्यात आली. सध्या मतदारसंघात जवळपास 45 दिवसांपेक्षा जास्त दिवस पावसाने खंड दिल्याने भीषण दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली असून, सोयाबीनसह इतर पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. या गंभीर बाबीसंदर्भात शासनाकडे सतत पाठपुरावा सुरू असून, लवकरात लवकर पंचनामे पूर्ण करून बाधित शेतकऱ्यांना तातडीने मदत मिळवून देण्यासाठी आणि शासनाकडे विशेष पॅकेज जाहीर करण्याची मागणी आपण केली असल्याचे आमदार सावंत यांनी स्पष्ट केले.
मतदारसंघातील सर्व पदाधिकाऱ्यांनी आपापल्या भागातील गावात पाणीटंचाईचा आढावा घ्यावा. गावनिहाय पाणीटंचाईची परिस्थिती, चारा छावण्या आणि पाणी टँकर सुरू करण्याबाबत आपण वैयक्तिक स्तरावरही ठोस प्रयत्न करणार असून, याबाबत सर्व पदाधिकाऱ्यांना बैठकीत आवश्यक त्या सूचना देण्यात आल्या.










