बाप, खलनायक, डॉनसह अन्य उपाधी – कळंबचा मालक आला, रिल्सचा जामीनीनंतर वर्षाव – ‘दादा ‘गिरी
धाराशिव – समय सारथी
परभणीनंतर धाराशिव जिल्ह्यातील कळंब येथील ड्रग्ज तस्करी गुन्ह्यात कोर्टाने नगरसेवक मोहसीन मिर्झा याला सशर्त जामीन दिल्यानंतर त्यांच्या समर्थकांनी कळंब शहरात जल्लोषात रॅली काढत स्वागत केले, हे स्वागत करणे आता चांगलेच अंगलट आले असुन पोलिसांनी मिर्झासह 40 जणांवर गुन्हा नोंद केला आहे तर तस्करी गुन्ह्यातील लखन गायकवाड, अरविंद कांबळे व नगरसेवक मिर्झा याच्यावर 110 ची प्रतिबंधात्मक कारवाई केली आहे, त्यांना 1 वर्षाचे शांतता राखण्याचे बंधपत्रक घेतले आहे. पालकमंत्री प्रतापराव सरनाईक यांनी स्पष्ट भुमिका घेत कारवाईचे निर्देश दिले होते त्यानंतर ठोस पावले उचलली जात आहेत.
बाप, खलनायक, डॉनसह अन्य उपाधी देत कळंबचा मालक आला कळंब चालवायला यासह अन्य गाणी लावत रिल्सचा वर्षाव करण्यात आला. आला तुमच्या सगळ्यांचा बाप आला, नायक नही खलनायक हू मैं, सगळं मार्केट आपलं आहे, बाप तो बाप रहेगा, जलवा तेरा जलवा, कळंबचा मालक आला कळंब चालवायला, कोणी नाही झाला पैदा रेकॉर्ड तोडायला या गाण्यासह किंग ऑफ कळंब, वाघ आला, आला भाई वापस, आला की बाप तुमचा वापस, डॉन बाप, दिलो में राज करता है, दादा का किरदार अशी घोषवाक्य टाकत स्वागत करण्यात आले, ही रॅली व वागणे अंगलट आले आहे. रिल्समध्ये मिरवणुक, पोलिस गाडीतून बाहेर येताना व कोर्ट परिसरातील व्हिडिओ व इतर जुने नवे व्हिडिओ रिल्ससाठी वापरले. एक रिल्स व्हिडिओ तर थेट पोलिस अधीक्षक कार्यालय समोरील रस्त्यावरचा आहे.
नगरसेवक मोहसीन सलीम मिर्झा, उमरान बाबर मिर्झा, तोसीन मिर्झा, ओमान मिर्झा, अमीर मिर्झा, सचिंत मस्के व इतर 40 इसम यांनी 31 ऑक्टोबर रोजी रात्री 8 च्या सुमारास होळकर चौक ते ईस्लामपुरा भागात मोमीन गल्ली येथे आरोपीची ड्रग्जच्या गुन्ह्यामधून जामीन झाल्याबद्दल मोटरसायकलवर रॅली काढून गैरकायद्याची मंडळी जमवून सार्वजनिक रस्ता आडवून येणारे जाणारे लोकांना अडथळा निर्माण करुन जल्लोष करुन सार्वजनिक शांततेचा भंग केला.
कळंब पोलिस ठाण्यातील गोविंद राजाभाउ मोटेगावकर यांनी 5 नोव्हेंबर रोजी दिलेल्या तक्रारीवरून भारतीय न्याय संहिता कलम 189(2), 190, 126(2), 281, सह कलम 110/117 महाराष्ट्र पोलीस अधिनियम सह कलम 129/194 (डी), 39/192 मोटार वाहन कायदा अन्वये गुन्हा नोंदवला असुन पोलिस याचा तपास करीत आहेत.
मिर्झा याच्यासह 3 जणांवर 110 अंतर्गत तर निखिल जाधव याच्यावर 107 अंतर्गत कारवाई केली आहे. कळंब पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक शकील शेख यांनी मिर्झा, गायकवाड व कांबळे या आरोपीवर प्रतिबंधात्मक कारवाईचा प्रस्ताव स्थानिक गुन्हे शाखेला दिला, त्यात दाखल गुन्ह्याची जंत्री देण्यात आली. मिर्झा याच्यावर कलम 307, 394 सह ड्रग्ज तस्करीचे 2 असे 6 गुन्हे नोंद आहेत तर गायकवाड याच्यावर 3 व कांबळेवर 2 गुन्हे नोंद आहेत.
जामीन मिळाल्यावर जल्लोष करून गुन्हेगारी प्रवृत्तीचे दर्शन केल्याने तरुण पिढीवर परिणाम होतो. अश्या गुंडाना व त्यांच्या गुंडगिरीला खपवुन घेणार नाही. मला काही समाजसेवकांनी व्हिडिओ पाठवले आहेत ते पाहून माझे सुद्धा डोके फिरले आहे. मी ज्या जिल्ह्याचा पालकमंत्री आहे, त्या जिल्ह्यात अश्या प्रकारच्या गुंड प्रवृत्तीच्या लोकांना खपवून घेतले जाणार नाही असे पालकमंत्री सरनाईक म्हणाले.
पालकमंत्री असे पर्यंत अशी गुन्हेगारी प्रवृत्तीची लोक डोके वर काढणार नाहीत, काढत असतील तर ते चेचावे अशी भुमिका घेतली असुन मकोका, तडीपारीसारखी कठोर कलमे लावुन अशा लोकांना जिल्ह्यातुन तडीपार करावे अश्या सुचना पोलिस अधीक्षकांना दिल्याचे पालकमंत्री सरनाईक म्हणाले. सरनाईक यांनी ‘कला केंद्र’ व ‘ड्रग्ज’ या दोन्ही सामाजिक विषयात ठोस भुमिका घेतल्याने अनेकांचे संसार वाचले आहेत. ‘कला केंद्र मुक्त’ धाराशिव जिल्हा याचे श्रेय त्यांना जाते.











