धाराशिव – समय सारथी
धाराशिव जिल्ह्याचे पालकमंत्री प्रतापराव सरनाईक यांच्या वतीने दुष्काळग्रस्त शेतकरी बांधवांसाठी दिवाळी निमित्त मोफत शिधा वाटप कार्यक्रम 3 नोव्हेंबर रोजी मंगळवारी सकाळी 9 वाजता श्री गणेश मंगल कार्यालय, बायपास रोड , धाराशिव येथे होणार आहे. या कार्यक्रमाला शेतकरी बांधवांनी उपस्थितीत राहावे असे आवाहन धाराशिव लोकसभा सह संपर्क प्रमुख सुरज राजाभाऊ साळुंके यांनी केले आहे.
शिध्यामध्ये साखर,मैदा,रवा,बेसन, डालडा,पणत्या,उटणे,लक्ष्मीची पावले आणि नवीन वर्षाची दिनदर्शिका यांचा समावेश आहे. शेतकऱ्यांच्या घरातील चूल विझू नये,त्यांच्या मुलांच्या चेहऱ्यावरील हास्य हरवू नये आणि दुष्काळातही त्यांची दिवाळी अंधारात जाऊ नये,यासाठी हा उपक्रम राबविण्यात येत आहे. संकटग्रस्त शेतकऱ्यांना मदत करण्याबरोबरच त्यांच्या मनात जगण्याचा विश्वास निर्माण करणे हीच खरी माणुसकी आणि सामाजिक बांधिलकी आहे असे प्रतिपादन पालकमंत्री सरनाईक यांनी केले.
दुष्काळाच्या झळा सोसणाऱ्या शेतकरी कुटुंबांच्या आयुष्यात दिवाळीचा आनंद फुलवण्यासाठी उपमुख्यमंत्री तथा शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांच्या सुचनेनुसार धाराशिव जिल्ह्यातील ‘दिवाळी शिधा’ मदत योजनेचा शुभारंभ करण्यात आला असुन या उपक्रमांतर्गत सुमारे दोन लाख कुटुंबांना दिवाळी फराळासाठी आवश्यक साहित्याचे वाटप पालकमंत्री प्रतापराव सरनाईक यांच्या हस्ते करण्यात येणार आहे.











