गुन्हेगारी प्रवृत्तीचे दर्शन, तरुण पिढीवर परिणाम – गुंडाना खपवुन घेणार नाही, कठोर कलमे लावा, तडीपार करा
धाराशिव – समय सारथी
ड्रग्ज तस्करी गुन्ह्यात जामीन मिळाल्यावर जल्लोष करून गुन्हेगारी प्रवृत्तीचे दर्शन केल्याने तरुण पिढीवर परिणाम होतो. अश्या गुंडाना व त्यांच्या गुंडगिरीला खपवुन घेणार नाही, त्यांच्यावर कठोर कलमे लावुन तडीपार करा असे आदेश पालकमंत्री प्रतापराव सरनाईक यांनी दिले, ते धाराशिव येथे पत्रकारांशी बोलत होते. पालकमंत्री यांच्या भुमिकेनंतर प्रशासकीय हालचाली सुरु झाल्या आहेत. सरनाईक यांनी ‘कला केंद्र’ व ‘ड्रग्ज’ या दोन्ही सामाजिक विषयात ठोस भुमिका घेतल्याने अनेकांचे संसार वाचले आहेत. ‘कला केंद्र मुक्त’ धाराशिव जिल्हा याचे श्रेय त्यांना जाते.
परभणीनंतर धाराशिव जिल्ह्यातील कळंब येथील ड्रग्ज तस्करी गुन्ह्यात कोर्टाने नगरसेवक मोहसीन मिर्झा यांना सशर्त जामीन दिल्यानंतर त्यांच्या समर्थकांनी कळंब शहरात जल्लोषात स्वागत केले. नगरसेवक मिर्झा यांच्यासह त्यांच्या समर्थकांनी सोशल मीडियावर त्यांच्या कळंब शहर आगमना निमित्त जल्लोष करीत पोस्टचा वर्षाव केला. बाप, खलनायक, डॉनसह अन्य उपाधी देत कळंबचा मालक आला कळंब चालवायला यासह अन्य गाणी लावत रिल्सचा वर्षाव केला, त्यावर पालकमंत्री सरनाईक यांनी चिंता व संताप व्यक्त केला.
आला तुमच्या सगळ्यांचा बाप आला, नायक नही खलनायक हू मैं, सगळं मार्केट आपलं आहे, बाप तो बाप रहेगा, जलवा तेरा जलवा, कळंबचा मालक आला कळंब चालवायला, कोणी नाही झाला पैदा रेकॉर्ड तोडायला या गाण्यासह किंग ऑफ कळंब, वाघ आला, आला भाई वापस, आला की बाप तुमचा वापस, डॉन बाप, दिलो में राज करता है, दादा का किरदार अशी घोषवाक्य टाकत स्वागत करण्यात आले. रिल्समध्ये मिरवणुक, पोलिस गाडीतून बाहेर येताना व कोर्ट परिसरातील व्हिडिओ व इतर जुने नवे व्हिडिओ रिल्ससाठी वापरण्यात आले आहेत, एक रिल्स व्हिडिओ तर थेट पोलिस अधीक्षक कार्यालय समोरील रस्त्यावरचा आहे.
मला काही समाजसेवकांनी व्हिडिओ पाठवले आहेत ते पाहून माझे सुद्धा डोके फिरले आहे. मी ज्या जिल्ह्याचा पालकमंत्री आहे, त्या जिल्ह्यात अश्या प्रकारच्या गुंड प्रवृत्तीच्या लोकांना खपवून घेतले जाणार नाही. गुन्हेगार म्हणुन त्यांना जेलमध्ये टाकल्यानंतर ते जामीनीवर सुटल्यानंतर जल्लोष करतात, मोटर सायकल रॅली काढतात, फटाके फोडतात. त्यातून वेगळ्या गुन्हेगारी प्रवृत्तीचे दर्शन घडवतात, यामुळे जो तरुण वर्ग व पिढी आहे अश्या घटनामुळे गुन्हेगारीकडे आकर्षित होते व गुन्हेगारी प्रवृत्तीकडे वळतो हे बिलकुल चालणार नाही. मी पालकमंत्री असे पर्यंत अशी गुन्हेगारी प्रवृत्तीची लोक डोके वर काढणार नाहीत, काढत असतील तर ते चेचावे अशी भुमिका घेतली असुन मकोका, तडीपारीसारखी कठोर कलमे लावुन अशा लोकांना जिल्ह्यातुन तडीपार करावे अश्या सुचना पोलिस अधीक्षकांना दिल्याचे पालकमंत्री सरनाईक म्हणाले.
नगरसेवक मिर्झा यांना परभणी जिल्ह्यातील ड्रग्ज तस्करी गुन्ह्यात अटक करण्यात आली त्यानंतर कळंब येथील गुन्ह्यात आरोपी करून अटक करण्यात आली, पोलिसांनी कोर्टात पाठविलेल्या दोषारोप पत्रानुसार त्यांच्यावर ड्रग्ज विक्रीचा ठपका ठेवण्यात आला आहे. कळंब ड्रग्ज तस्करी गुन्ह्यात 9 आरोपी असुन पोलिसांनी जवळपास दीड हजार पानांचे चार्जशीट दाखल केले आहे. धाराशिव पोलिस अधीक्षक रितु खोखर, अपर पोलिस अधीक्षक सचिन पांडकर, उपविभागीय पोलीस अधिकारी संजय पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक शकील शेख हे तपास करीत असुन अन्य काही संशयित रडारवर आहेत. जिल्हा सरकारी वकील ऍड महेंद्र देशमुख व सहायक सरकारी वकील ऍड आशिष कुलकर्णी यांनी कोर्टात बाजु मांडली.











