धाराशिव, लातुर व सोलापूर या 3 जिल्ह्यातुन 2 वर्षासाठी हद्दपार करण्याची शिफारस – सुनावणी
पालकमंत्री सरनाईकांचा हस्तक्षेपास नकार – ड्रग्ज, कला केंद्रनंतर गुन्हेगारांसाठी ठोस भुमिका
धाराशिव – समय सारथी
तुळजापूरचे दबंग नेते अशी ओळख असलेल्या देवानंद साहेबराव रोचकरी व त्यांचे पुत्र शिवसेना युवासेनेचे तुळजापूर संपर्क प्रमुख गणेश रोचकरी यांच्या हद्दपारीचा प्रस्ताव पोलिस विभागाने पाठवला असुन या प्रकरणी सुनावणीला सुरुवात झाली आहे. उपविभागीय पोलिस अधिकारी मनोहर पाटील यांनी उपविभागीय दंडाधिकारी ओंकार देशमुख यांच्याकडे या पिता पुत्राच्या गुन्ह्याची यादी जोडत लेखी अहवाल पाठवला आहे. रोचकरी यांना धाराशिव, लातुर व सोलापूर अश्या 3 जिल्ह्यातुन 2 वर्षासाठी हद्दपार करण्याची शिफारस केली आहे. जिल्हाधिकारी यावर काय निर्णय घेतात याकडे लक्ष लागले आहे.
तुळजापूर पोलिस निरीक्षक अण्णासाहेब मांजरे यांनी देवानंद रोचकरी यांच्यावर 1984 पासुन गेल्या 42 वर्षात दाखल 37 गुन्ह्याची तर गणेश रोचकरी याच्यावर 2012 पासुन दाखल 9 गुन्ह्यांची यादी देत प्रस्ताव पाठवला आहे. देवानंद रोचकरी यांच्यावर गंभीर मारहाण, सरकारी नौकरास मारहाण, फसवणूकीचे असे 37 गुन्हे नोंद असुन त्यातील 29 गुन्ह्यात त्यांना कोर्टाने सबळ पुराव्या अभावी दोषमुक्त केले आहे, 5 गुन्ह्यात त्यांनी फिर्यादीसोबत तडजोड केली असुन 3 गुन्हे न्यायालयात सुनावणी स्तरावर प्रलंबित आहेत.
गणेश रोचकरी याच्यावर 9 गुन्हे नोंद असुन त्यात खुनाचा प्रयत्न करणेसह शस्त्र अधिनियम अंतर्गत गुन्हे नोंद आहेत त्यातील 6 गुन्ह्यात कोर्टाने निर्दोष मुक्तता केली असुन 2 कोर्टात प्रलंबित आहेत तर 1 गुन्हा पोलिस तपासावर आहे. या दोघांवर अनेकदा शांतता व सुव्यवस्था राखण्यासाठी प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली होती मात्र कोणतीही सुधारणा न झाल्याने अखेर पोलिसांनी महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 चे कलम 56 (अ) (ब) प्रमाणे हद्दपारीचा प्रस्ताव सादर केला आहे.
पोलिसांनी गुन्ह्यांची फेरीस्त अहवालासोबत पाठवली असुन त्यात काही साक्षीदार यांचे गोपनीय जबाब आहेत. कायदा सुव्यवस्था हा मुद्दा पुढे करीत पोलिसांनी पिता पुत्राचा हद्दपारीचा अहवाल दिला आहे. देवानंद रोचकरी यांच्यावर तुळजाभवानी मातेचे मंकावती तीर्थकुंड बोगस कागदपत्रे तयार करून हडप केल्याचा कट रचल्याचा गुन्हा नोंद असुन यासह अन्य गुन्ह्यात त्यांना अटक झाल्यावर 2 महिने जेलवारी सुद्धा झाली आहे, ते प्रकरण सध्या न्यायप्रविष्ट आहे. तुळजाभवानी मंदिरासमोरील तब्बल 1 हजार 244 चौरस मीटर आकाराच्या मंकावती कुंडाची महती स्कंद पुराण,तुळजाई महात्म्य व देविविजय पुराणात आहे मात्र त्यावर रोचकरी यांनी मालकीचा दावा करीत ताबा घेतला होता. गणेश रोचकरीवरील 9 पैकी 6 गुन्हे हे 307 जीवे मारण्याच्या प्रयत्नाचे आहेत.
देवानंद रोचकरी यांच्यावर 307 सह हाणामारीचे विविध 31 गुन्हे नोंद आहेत, सरकारी नौकरास मारहाणीचे 4, फसवणुकीचे गुन्हे नोंद आहेत. हद्दपारीचा प्रस्ताव असलेले रोचकरी पिता पुत्र हे गुंडगिरी वृत्तीचे व खुनशी असल्याने बऱ्याच गुन्ह्यात साक्षीदार आणि फिर्यादी हे भीतीने न्यायालयात साक्ष देऊ शकले नाहीत, भितीमुळे गुन्हे तडजोड झाल्याचे निदर्शनास आल्याचे अहवालात नमुद आहे, प्रतिबंधात्मक कारवाई करून वर्तवणुकीत कोणतीही सुधारणा झालीच नाही शिवाय गुन्हेगारी कारवाया वाढल्या आहेत. तुळजापूर व परिसरात दहशत निर्माण झाल्याने सार्वजनिक जीवितास व मालमत्तेच्या संरक्षणाची भिती निर्माण झाली आहे. शांतता व कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी 2 वर्षाच्या हद्दपारीचा प्रस्ताव दिला आहे.
हद्दपारीच्या प्रस्तावावर म्हणणे सादर करण्यासाठी पोलिसांनी रोचकरी पिता पुत्रांना नोटीस बजावत संधी देण्यात आली होती, त्यात त्यांनी काही गुन्हे हे खोटे व राजकीय द्वेषातुन दाखल झाल्याचे म्हणटले आहे. मुलगी सीमा माडजे ही जिल्हा परिषद सदस्य व मुलगा कृष्णा हे पंचायत समितीमध्ये निवडुन आल्याने राजकीय द्वेषापोटी खोटे निवेदन दिल्याचा तसेच नोटीस बेकायदेशीर, वस्तुस्तिथी विसंगत असल्याचा, मुलांचे राजकीय अस्तित्व संपवण्याच्या उद्देशाने नोटीस दिल्याचा बचाव घेतला मात्र पोलिसांनी तो अमान्य करीत जिल्हाधिकारी यांच्याकडे पुढील कार्यवाहीसाठी प्रस्ताव पाठवला.
रोचकारी यांची कन्या व मुलगा हे जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्य म्हणुन उत्तर प्रदेशातील मुलायम सिंह यादव यांच्या समाजवादी पार्टीकडुन निवडुन आले आहेत, देवानंद यांनी अनेकदा विधानसभा विविध पक्षाकडून लढवली आहे. देवानंद व गणेश रोचकरी हे सध्या सत्ताधारी शिवसेना शिंदे पक्षात आहेत. पालकमंत्री सरनाईक यांच्यासोबत त्यांचा वावर गृहभेटी व अनेक कार्यक्रमातून अधोरेखित असतो. हद्दपारीच्या प्रकरणात दिलासा मिळण्यासाठी पालकमंत्री यांनी हस्तक्षेप करावा अशी गळ रोचकरी यांनी घालत मुंबईवारी केल्याचे कळते मात्र त्यांनी नकार दिल्याचे कळते. ड्रग्ज, कला केंद्र मुक्त धाराशिवनंतर गुन्हेगार व प्रवृत्तीसाठी सरनाईकांनी ठोस भुमिका घेतली आहे. कळंब ड्रग्ज तस्करीत त्यांनी कडक कारवाईच्या सुचना दिल्या आहेत.











