धाराशिव – समय सारथी
‘आपला जीव धाराशिव’ व्हिजन 2030 व मुख्यमंत्री समृद्ध पंचायत अभियान कार्यशाळेच्या बॅनरवरून सत्ताधारी भाजप व शिवसेना शिंदे गटात वादाची ठिणगी पडली आहे. सावंत यांचा फोटो नसल्याने शिवसेना आक्रमक झाली असुन काही सदस्यांनी कार्यक्रमावर बहिष्कार टाकला तर ऍड अजित खोत यांनी टीका केली.
लोकसभेला सावंत साहेब हवेत,जिल्हा परिषद अध्यक्ष करण्यासाठी सावंत साहेब हवेत,मग शासकीय कार्यक्रमाच्या बॅनरवर शिवसेनेचे एकमेव आमदार तथा माजी मंत्री तानाजीराव सावंत साहेबांचा फोटो का नको ? धाराशिव जिल्हा परिषदेत शिवसेनेचे 15 सदस्य असतानाही शिवसेनेला दुय्यम वागणूक देण्याचे धाडस कोणाच्या सांगण्यावरून केले जात आहे? हा जिल्हा परिषदेचा शासकीय कार्यक्रम आहे, भाजपाचा व्यक्तिगत कार्यक्रम नाही अशी टीका ऍड खोत यांनी केली.
एकीकडे महायुतीचा धर्म सांगायचा आणि दुसरीकडे महायुतीतील घटक पक्षाच्या नेत्याचा फोटो जाणीवपूर्वक बॅनरवरून वगळायचा, हा दुटप्पीपणा धाराशिव जिल्ह्यातील शिवसैनिक कदापि सहन करणार नाहीत.
‘आपला जीव धाराशिव’ व्हिजन 2030 व मुख्यमंत्री समृद्ध पंचायत अभियान कार्यशाळेच्या बॅनरवरून तानाजीराव सावंत साहेबांचा फोटो जाणीवपूर्वक वगळणे म्हणजे केवळ एका नेत्याचा नव्हे, तर धाराशिव जिल्ह्यातील तमाम शिवसैनिकांचा अपमान आहे. सावंत यांचा अपमान म्हणजे शिवसैनिकांचा अपमान आणि शिवसैनिकांचा अपमान आम्ही कदापि खपवून घेणार नाही असा इशारा दिला.
शासकीय कार्यक्रमाच्या नावाखाली सुरू असलेल्या या राजकीय दादागिरीचा आणि जाणीवपूर्वक केलेल्या अपमानाचा आम्ही तीव्र शब्दांत निषेध करतो. या निषेधार्थ शिवसैनिक म्हणून आम्ही सदर कार्यक्रमावर बहिष्कार टाकत आहोत अशी भुमिका घेतली. महायुतीचा धर्म पाळा,सहकारी पक्षाचा सन्मान करा असे ते म्हणाले.











