अहवाल सादर करण्याचे आदेश – शिवसेना शिंदे गटाची तक्रार, धाराशिव नगर परिषद
धाराशिव – समय सारथी
केंद्रीय दक्षता आयोग अर्थात सीव्हीसीच्या मार्गदर्शक निविदा तत्वांना डावलुन विशिष्ट कंत्राटदाराला काम देण्यासाठी काढलेली निविदा रद्द करुन धाराशिव नगर परिषदेच्या सर्व 17 कोटींच्या कामाची फेर निविदा करुन खुली स्पर्धा करावी अशी तक्रार शिवसेना शिंदे गटाचे सोमनाथ गुरव यांनी पालकमंत्री प्रतापराव सरनाईक यांच्याकडे केली आहे. अटी व आर्थिक गैरव्यवहाराच्या तक्रारीमुळे सत्ताधारी भाजप व शिवसेना शिंदे गटात पुन्हा एकदा वाद पेटणार आहे.
तक्रारीच्या अनुषंगाने अहवाल सादर करण्याचे आदेश नगर विकास विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव यांनी नगर परिषदेला दिले आहेत. प्रशासकीय मान्यता मिळाल्यानंतर लवकर निविदा काढणे गरजेचे असताना 3 महिन्यांनी निविदा काढण्यात आली, त्यातही मनमानी पद्धतीने लाडक्या ठेकेदाराला काम मिळावे यासाठी काही अटी जाणीवपूर्वक टाकल्याचा आरोप आहे. गुरव यांनी उपमुख्यमंत्री व पालकमंत्री या दोघांकडे तक्रार केली आहे.
महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान अभियान सन 2025-26 अंतर्गत नागरी दलितेत्तर वस्ती सुधार योजना लोकशाहीर आण्णाभाऊ साठे नागरी वस्ती सुधार योजनेच्या कोट्यावधी रुपयांच्या कामांच्या निविदा नगर परिषद मार्फत प्रकाशित केल्या होत्या. या निविदांमध्ये ठराविक कंत्राटदारांना सदर काम मिळावे यासाठी केंद्रीय दक्षता आयोगाच्या निविदा मार्गदर्शक तत्वांना डावलून विशिष्ट अटींचा समावेश केला जात आहे, यामुळे निविदा प्रक्रीयामध्ये खुली स्पर्धा होत नाही.
निविदा प्रक्रियामध्ये मोठ्या प्रमाणावर आर्थिक गैरव्यवहार होण्याची शक्यता आहे. नगर परिषदेचे पर्यायाने शासनाचे मोठया प्रमाणात आर्थिक नुकसान होणार असल्यामुळे सर्व कामांच्या फेर निविदा काढून पुर्वीची निविदा रद्द करण्यात यावी, अशी मागणी गुरव यांनी केली आहे.












