धाराशिव – समय सारथी
कळंब ड्रग्ज तस्करी गुन्ह्यातील आरोपी नगरसेवक मोसीन मिर्झा व लखन विजय गायकवाड यांचा नियमित जामीन अर्ज कळंब येथील अतिरिक्त सत्र न्यायाधीश व्ही के मंडे यांनी फेटाळून लावत जामीन नाकारला आहे. आरोपींच्या वतीने ऍड यु डी खैरे यांनी तर सरकारच्या वतीने जिल्हा सरकारी वकील ऍड महेंद्र देशमुख यांनी बाजु मांडली. ऍड देशमुख यांनी तुळजापूर ड्रग्ज तस्करी गुन्ह्यात सुद्धा सरकार पक्षाची बाजु सक्षमपणे मांडली होती.
मिर्झा व गायकवाड याचा या गुन्ह्यात सक्रीय सहभाग असुन गुन्ह्यातील आरोपीनी मिर्झा, गायकवाड व इतर आरोपीकडुन ड्रग्ज खरेदी केले. आरोपीवर यापुर्वी अश्या स्वरूपासह अन्य गुन्हे प्रलंबित आहेत. ड्रग्ज तस्करी गुन्ह्याचा तपास सुरु असुन आरोपीना जामीन दिल्यास ते साक्षीदारवर दबाव आणुन पुराव्याशी छेडछाड करतील म्हणुन जामीन नाकारावा अशी बाजु ऍड देशमुख यांनी मांडली. आरोपीना जामीन दिल्यास ते पुन्हा अश्याच स्वरूपाचा गुन्हा करण्याची शक्यता आहे, असे निरीक्षण नोंदवित जामीन नाकारला.
परभणी पाठोपाठ कळंब ड्रग्ज तस्करी गुन्ह्यात नगरसेवक मोसीन सलीम मिर्झा याचा सहभाग आढळून आल्यानंतर पोलिसांनी तपासाअंती आरोपी केले. मिर्झा हा परभणी जेलमध्ये आहे तर गायकवाड हा धाराशिव जिल्हा कारागृहात आहे. जामीन नाकारल्याने त्यांचा जेलमधील मुक्काम वाढला आहे. तपास पुर्ण झाला असुन मिर्झा व गायकवाड याचे नाव राजकीय शत्रुत्व द्वेषाने टाकल्याचा युक्तिवाद वकिलांनी केला.
धाराशिव पोलिस अधीक्षक रितु खोखर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक शकील शेख हे तपास करीत आहेत. निखिल युवराज जाधव, अरविंद दादाराव कांबळे,लखन गायकवाड, अक्षय रिटे, सलीम मिर्झा व सुशांत सुतार हे 6 आरोपी कळंब ड्रग्ज तस्करीत अटक करण्यात आले असुन जेलमध्ये आहेत. बँक खाती, आर्थिक व्यवहार, सीडीआर व इतर पुराव्याच्या आधारे पोलिस तपास करीत आहेत.
धाराशिव पोलिस अधीक्षक रितु खोखर, अपर पोलिस अधीक्षक सचिन पांडकर यांच्या मार्गदर्शनाखाली धाराशिव पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने पोलिस निरीक्षक विनोद इज्जपवार यांच्या मार्गदर्शनाखाली मोठी कारवाई करीत 2 आरोपीना 4 ऑगस्ट रोजी अटक केली होती त्यानंतर कळंब ड्रग्ज तस्करीचा भांडाफोड झाला. 11.21 ग्रामच्या वजनाच्या 29 पुड्या एमडी ड्रग्ज जप्त करीत आरोपीना रंगेहात पकडले. 55 हजाराचे ड्रग्ज व दुचाकी असा 1 लाख 10 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला होता.
स्थानिक गुन्हे शाखा धाराशिवचे सपोनि खटके, सपोनि मगर पो.स्टे कळंब , पोहेकॉ राठोड पोहेकॉ जानराव , पोहेकाॉ गादेकर,पोहेकॉ जाधवर पोहेकॉ चौरे, पोना जाधवर पोना ढगारे, पोअं मुंगळे , पोहेकॉ शेख पोस्टे कळंब , पोहेकॉ माळवे पोस्टे कळंब,पोअं बोईनवाड , पोहेकॉ आरब, चापोहेकॉ माने यांनी कामगिरी केली होती.










