धाराशिव – समय सारथी
भाजपच्या वतीने आयोजित शिस्तबद्ध गणेश विसर्जन मिरवणूक व उत्कृष्ट पथक सादरीकरण 2025 स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ प्रतिष्ठान भवन येथे उत्साहात पार पडला. यावेळी मल्हार राणाजगजीतसिंह पाटील यांच्या हस्ते विजेत्या मंडळ व गणेश भक्तांना बक्षीस देण्यात आले. दरम्यान भाजपने घोषित केल्या प्रमाणे बक्षीस वितरण केले मात्र महाविकास आघाडी मार्फत खासदार ओम राजे निंबाळकर यांनी जाहीर केलेली बक्षिसे अद्याप दिली गेली नाहीत. मंडळाना अद्याप त्याची प्रतिक्षा आहे.
गणेशोत्सवाची परंपरा जपत शिस्त, संस्कृती, सामाजिक संदेश आणि कलाविष्काराला प्रोत्साहन देण्याच्या संकल्पनेतून आयोजित करण्यात आलेल्या या स्पर्धेत सहभागी झालेल्या सर्व गणेश मंडळांनी आणि पथकांनी उत्कृष्ट सादरीकरण केले.
प्रथम पारितोषिक हे 1 लाख व सन्मान चिन्ह हे लोकमान्य टिळक गणेश मंडळ, जुनी राम मंदिर, कसबा, धाराशिव यांना ‘शहीद भगतसिंग’ नाट्यनृत्य आविष्कार, द्वितीय पारितोषिक रोख रक्कम व सन्मानचिन्ह व श्री गणेश तरुण मंडळ, श्री गणेश नगर, धाराशिव ‘पावनखिंड’ नाट्यनृत्य आविष्कार, तृतीय पारितोषिक रोख रक्कम व सन्मानचिन्ह देण्यात आले.
जय मल्हार तरुण गणेश मंडळ, देवकते गल्ली, धाराशिव, पारंपरिक ‘पोतराज लोकनृत्य’ सादरीकरण, उत्तेजनार्थ पारितोषिके श्री बालाजी तरुण गणेश मंडळ, बालाजीनगर, शेकापूर रोड, धाराशिव, हिंगळज माता तरुण गणेश मंडळ, धाराशिव या मंडळांना देण्यात आले. ढोल-ताशा पथक सादरीकरण स्पर्धेत मऱ्हाटेशाही ढोल-ताशा पथक, राजमाता जिजाऊ चौक, धाराशिव यांना सन्मानित करण्यात आले.
यावेळी सौ. नेहा राहुल काकडे, नगराध्यक्ष, धाराशिव नगरपालिका, ॲड. नितीन भोसले, प्रवक्ते, भारतीय जनता पार्टी, धाराशिव, दिनेश बंडगर, राहुल काकडे, विलास बापू लोंढे, अभिजित काकडे, प्रवीण माळी, इंद्रजीत देवकते, गणेश घोडके, सौ. राजकन्या अडसूळ, आबा इंगळे, सदानंद अकोसकर यांच्यासह असंख्य गणेश भक्तांची तसेच नागरिकांची उपस्थिती होती.









