धाराशिव – समय सारथी
एकीकडे जिल्हा परिषद गटांना अपेक्षित विकास निधी मिळत नसल्याचा सुर भाजपच्या काही सदस्यात असतानाच आमदार सावंत यांनी प्रत्येक जिल्हा परिषद गटाला दीड कोटी रुपयांचा निधी देण्याची घोषणा केली आहे. सावंतांच्या घोषणेनंतर भाजप गोटात चुळबुळ वाढली आहे. भूम परंडा वाशी विधानसभा मतदारसंघातील विकासकामांना मोठी चालना देण्यासाठी ही भुमिका जाहीर केल्याचे सांगितले. निधी कोणत्या कामासाठी वापरायचा याचा अधिकारही सदस्यांना दिला आहे, सदस्यांनी व स्थानिकांनी कामे सुचवायची आहेत. आमदार निधी, जिल्हा नियोजन समितीसह अन्य निधीही दिला जाणार आहे शिवाय गरज असेल तिथे स्वतःच्या खिशातून जनतेची कामे करू असे आश्वासन सावंतांनी दिले.
धाराशिव जिल्हा परिषदेतील सत्ताधारी भाजपच्या अनेक सदस्यात निधी वाटप व अधिकार यांच्यावरून प्रचंड मोठी खदखद आहे. सदस्यांना न विचारता गृहीत धरून निधी कोठे खर्च करायचा याचे निर्णय घेत, ते लादले जातात. शिवाय काही उभरत्या नेतृत्वाच्या भ्रमणावर व जनसंपर्कावर करडी नजर ठेवली जात असल्याचा आरोप होत आहे, त्यातच एकाची गाडी काढुन घेतल्याची चर्चा आहे. 8 पैकी 6 सदस्यांच्या टीमने नाराजी व्यक्त करीत महायुतीतील सहयोगी पक्षातील आमदार सावतांची पुणे येथे भेट घेतल्याची चर्चा रंगत आहे.
भूम, परंडा व वाशी तालुक्यांतील लोकप्रतिनिधी आणि कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत पुणे येथे झालेल्या या बैठकीत मतदारसंघातील विविध विकासकामांबाबत चर्चा करण्यात आली. यावेळी प्रत्येक जिल्हा परिषद गटाला समान निधी देण्याचा निर्णय आमदार सावंत यांनी जाहीर केला.
भूम तालुक्यातील ईट, सुकटा, पाथरूड, वालवड व आष्टा, परंडा तालुक्यातील शेळगाव, आनाळा, जवळा, डोंजा व लोणी तसेच वाशी तालुक्यातील पारगाव, पारा व तेरखेडा अशा एकूण 13 जिल्हा परिषद गटांना प्रत्येकी दीड कोटी रुपये उपलब्ध होणार आहेत.या निधीमुळे ग्रामीण भागातील विविध प्रलंबित विकासकामांना गती मिळणार असून, नागरिकांच्या मूलभूत गरजा आणि स्थानिक पातळीवरील आवश्यक विकासकामे मार्गी लागण्यास मदत होणार आहे.
मतदारसंघातील प्रत्येक गटाचा समान विचार करून निधी उपलब्ध करून देण्याच्या निर्णयाचे लोकप्रतिनिधी व कार्यकर्त्यांकडून स्वागत करण्यात आले.“मतदारसंघातील प्रत्येक गटाला समान न्याय देत विकासकामांसाठी भरीव निधी उपलब्ध करून देण्याचा निर्णय कौतुकास्पद आहे. या माध्यमातून तळागाळातील नागरिकांपर्यंत विकासकामे पोहोचण्यास मोठी मदत होणार आहे,” अशी भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.
दरम्यान, या निर्णयाबद्दल नगरपालिकेचे माजी गटनेते संजय गाढवे, पंचायत समिती सदस्य प्रशांत मुंडेकर,भाऊसाहेब मारकड, भाऊसाहेब घरत, संतोष लोखंडे, खंडेराव गोयकर, दत्ता नलवडे यांच्यासह कार्यकर्ते व पदाधिकारी पदाधिकारी यांनी भूम तालुक्याच्या वतीने वतीने आमदार प्रा डॉ तानाजीराव सावंत यांचे जाहीर आभार मानण्यात आले.आमदार सावंत यांच्या या निर्णयामुळे भूम परंडा वाशी मतदारसंघातील विकासकामांना आणखी गती मिळण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.










