आत्महत्या करू नका, सरकार पाठीशी – पालकमंत्री सरनाईकांचे आवाहन
धाराशिव – समय सारथी
दुष्काळ, नापिकी व कर्जबाजारीपणाला कंटाळून धाराशिव तालुक्यातील खानापूर येथील 32 वर्षीय शेतकरी दयानंद संतराम राठोड यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली. दुष्काळ व कर्जफेडीची चिंतेने व्यथित झालेल्या राठोड यांनी अखेर जीवनयात्रा संपवली.
राठोड यांना 4 एकर जमीन असुन त्यांनी शेतात सोयाबीन पेरले होते मात्र ते उगवून आले नाही, घरचा संसार गाडा कसा चालवायचा या चिंतेने ते व्यथित होते. या घटनेनंतर पोस्टमार्टम करून मृतदेह जिल्हाधिकारी कार्यालयात आणुन ठेवत संताप व्यक्त केला. आमदार कैलास पाटील व काँग्रेस जिल्हाध्यक्ष उमेश राजे निंबाळकर यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात येऊन सांत्वन केले व जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांची भेट घेऊन मदत करण्याची मागणी केली.
सिबीलचे कारण दाखवून राठोड यांचे कर्ज नाकारले. 10 लाख रुपये मदत द्या, वारसास सरकारी नोकरी द्यावी व कर्ज नाकारणाऱ्या बँकेवर गुन्हा नोंद करा. मुलांच्या शिक्षणाची जबाबदारी सरकारने घ्यावी अशी मागणी केली. निवासी जिल्हाधिकारी विद्याचरण कडावकर यांनी कारवाई आणि मदत देण्याचे आश्वासनासह शासकीय योजनाचा लाभ देणार असल्याचे आश्वासन दिल्यानंतर तणाव निवळला.
सरकारच्या फक्त घोषणा, प्रत्यक्षात मदत नाही असा आरोप नातेवाईकांनी केला. राठोड यांच्या पश्चात 1 मुलगा व एक मुलगी आहे. सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी आहे, दुष्काळाचे संकट असले तरी शेतकऱ्यांनी आत्महत्यासारखे टोकाचे पाऊल उचलू नये असे आवाहन पालकमंत्री प्रतापराव सरनाईक यांनी केले आहे.











