गुटखा तस्करीत अटकपुर्व जामीन अर्ज – 3 आरोपींचा जामीन धाराशिव कोर्टाने नाकारला, व्हिडिओ व्हायरल
धाराशिव – समय सारथी
तुळजापूर येथील ड्रग्ज तस्करी गुन्ह्यातील आरोपी इंद्रजीतसिंह उर्फ मिटू ठाकूर याने अटकपुर्व जामीन मिळावी यासाठी सुप्रीम कोर्टात अर्ज केला मात्र कोर्टाची कडक भुमिका लक्षात येताच माघार घेतली. न्यायमूर्ती दीपांकर दत्ता व न्यायमूर्ती सतीशचंद्र शर्मा यांच्या कोर्टात सुनावणी पार पडली. तुळजापूर ड्रग्ज तस्करीत 39 आरोपी निष्पन्न झाले असुन ठाकुर व वैभव गोळे हे 2 आरोपी अद्याप फरार आहेत.
ठाकुर हा गेली 15 महिन्यापासुन फरार असुन तो सापडत नसल्याने पोलिस हतबल झाले आहेत. ड्रग्ज तस्करीत फरार असताना ठाकुर याचे नाव गुटखा तस्करीत आले असुन पोलिसांना शिवीगाळ करणे या गुन्ह्यातही तो फरार आहे. गुटखा तस्करी गुन्ह्यात त्याने धाराशिव कोर्टात अटकपुर्व जामिनीसाठी अर्ज केला असुन तो निर्णयासाठी प्रलंबीत असुन 6 मे रोजी सुनावणी आहे. दरम्यान नळदुर्ग येथील घटनेचा व्हायरल व्हिडिओ समोर आला असुन त्यात ठाकुर पोलिसांशी हुज्जत घालताना दिसत आहे.
नळदुर्ग गुटखा तस्करीत धाराशिव येथील कोर्टाने संजय सुभाष जगताप ( वानेवाडी ता पाटोदा) सचिन परमेश्वर पवार ( रा.कुसळंब ता पाटोदा) व सतीश तुकाराम सोंडगे ( गवळवाडी ता पाटोदा जि. बीड) या 3 आरोपीचा जामीन अर्ज फेटाळला असुन न्यायाधीश आवटे यांनी जामीन नाकारला आहे. गुटखा कोणाकडून आणले आणि कोणाला विक्री करणार होते याचा तपास करणे असल्याने कोर्टाने जामीन नाकारला असुन हे आरोपी धाराशिव येथील कारागृहात आहेत. गुटखा रॅकेट प्रकरणी आमदार सुरेश धस यांनी आक्रमक भुमिका घेतली असुन कारवाईसाठी पोलिस महासंचालक यांना पत्र तर पोलिस अधीक्षकांवर हक्कभंगाचा इशारा दिला आहे तरी ठाकुर सापडेना.

धाराशिव जिल्ह्यातील तामलवाडी येथे पोलिसांनी 14 फेब्रुवारी 2025 रोजी कारवाई करीत ड्रग्जसह 3 आरोपीना अटक केले. या गुन्ह्यात इंद्रजीतसिंह ठाकुर याचे नाव निष्पन्न झाल्यापासुन तो फरार आहे. यात जप्त गाडी कागदोपत्री दुसऱ्याच्या नावची असली तरी ती नोंदणी वेळी आरटीओ कार्यालयात ठाकुर याचा नंबर आहे शिवाय इतर आरोपी सोबत कॉल रेकॉर्ड व त्यांचे जबाब आहेत. पोलिसांनी 14 आरोपी मर्यादित 10 हजार 744 पानांचे चार्जशीट कोर्टात पाठवले आहे.
ठाकुर खुलेआम फिरत असतानाही पोलिसांनी पकडण्याचे धाडस न दाखवल्याने त्याची हिम्मत वाढली आणि तो पोलिसांवरच वरचढ ठरला. नळदुर्ग येथे पोलिस गुटखा तस्करावर कारवाई करीत असताना ठाकूर हा त्याच्या सहकाऱ्यासोबत आला व तुम्ही गाडी कशी काय पकडली, गाडी सोडून दे नाहीतर तुला बघतो अशी धमकी दिली व शासकीय कामात अडथळा निर्माण करून सहीसलामत निघून गेला. याप्रकरणी दत्तात्रय कुंभार यांनी दिलेल्या फिर्यादीवरून ठाकूरसह 4 जणांवर गुन्हा नोंद करण्यात आला आहे त्यात 3 आरोपीना अटक केली असुन ठाकुर पोलिसांना सापडत नाही.
ड्रग्ज गुन्ह्यात ठाकुर याने 2 वेळेस उच्च न्यायालयात अटकपुर्व जामिनीसाठी अर्ज केला होता परंतु कोर्टाने गुन्ह्यांचे स्वरूप व आरोपीचा गुन्ह्यातील सहभाग लक्षात घेता नकार देत अर्ज फेटाळला त्यानंतर त्याने सुप्रीम कोर्टाचे दार ठोठावले मात्र तिथेही स्तिथी पाहून माघार घेतली. आता तरी पोलिस अटक करणार का ? हे पाहावे लागेल. दरम्यान ड्रग्ज तस्करी गुन्ह्याचा तपास सुरुच असुन त्यात अतिरिक्त पुरवणी दोषारोपपत्र अद्याप कोर्टात सादर झालेले नाही. ठाकूरला अभय देणारा पाठीराखा कोण ? याचीही चर्चा यानिमित्ताने होत आहे.











