धाराशिव – समय सारथी
कुंभमेळा प्राधिकरणाचे अध्यक्ष तथा नाशिकचे विभागीय आयुक्त डॉ प्रवीण गेडाम यांच्या बनावट स्वाक्षरीने 70 कोटी रुपयांची कार्यारंभ आदेश वर्क ऑर्डर देऊन फसवणूक करण्याचा प्रकार समोर आला असुन या प्रकरणी पोलिसात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. डॉ गेडाम यांच्या अधिकृत डिजिटल स्वाक्षरीत ‘Praveen’ असे स्पेलिंग असताना बनावट पत्रांवर ‘Pravin’ असे स्पेलिंग होते. ही बाब डॉ गेडाम यांच्या नजरेने हेरली व ही सही आपली नसल्याचे त्यांच्या लक्षात आले आल्याने भांडाफोड झाला.
कुंभमेळ्यानिमित्त सीसीटीव्ही सर्वेक्षण बसविणे, कार्यान्वित करणे व देखभालीच्या कामांच्या कार्यादेशावर नाशिकचे विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांची बनावट डिजिटल स्वाक्षरी वापरुन त्र्यंबकेश्वर-कुंभमेळा प्राधिकरणाच्या नावाने तब्बल 35 कोटींच्या 2 कामांची थेट वर्क ऑर्डर काढण्यात आली होती. हा कार्यादेश ‘इनोव्हेटिव्ह इंटेलिजन्स एआय ऑटोमेशन सोल्युशन्स एजन्सी, ठाणे’ या संस्थेच्या नावे तयार करण्यात आला होता.
याप्रकरणी नाशिक रोड पोलिसांत अज्ञात संशयिता विरोधात गुन्हा दाखल झाला आहे. डॉ गेडाम यांचे स्वीय सहायक विजय गोरख सोनवणे यांनी नाशिकरोड पोलिसांत फिर्याद दिली आहे. 28 एप्रिल रोजी नीळकंठ शेवाळे नावाचा व्यक्ती नाशिक विभागीय आयुक्त कार्यालयात आला. त्याने दोन संशयास्पद पत्रांच्या वैधतेबाबत विचारणा केली. ही पत्रे त्यांना स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नांदेडचे गजानन पाटील चव्हाण यांनी दिल्याचे त्यांनी सांगितले.
शेवाळे यांच्याकडील दोन आदेशाच्या प्रती व त्यांच्याच भ्रमणध्वनीतील पीडीएफ फाईल पाहिल्यानंतर दोन्ही कागदपत्रातील मजकूर, पत्राच्या टायपिंगमधील फरक, प्रकल्पाची मंजूर रक्कम आणि विभागीय आयुक्तांच्या डिजिटल स्वाक्षरीत विसंगती असल्याचा संशय आला. त्यामुळे ही कागदपत्रे प्राधिकरणाचे अध्यक्ष तथा विभागीय आयुक्त प्रवीण गेडाम यांना दाखविण्यात आली. तेव्हा त्यांच्या इंग्रजीतील नावातील अक्षरांतील चुकीमुळे कार्यादेश बनावट असल्याचे स्पष्ट झाले.











