6 बंद तर 6 नवीन प्रस्ताव, छुप्या छमछमचे आव्हान – पुनर्वसनाची प्रशासनाची तयारी
धाराशिव – समय सारथी
धाराशिव जिल्हा कला केंद्र मुक्त झाला असुन तुळजाई, पिंजरा, कालिका, महाकाली, गौरी, साई ही 6 कला केंद्राचे परवाने रद्द करण्यात आले आहेत, त्यातील काहींना सील ठोकले आहे. पालकमंत्री प्रतापराव सरनाईक यांनी कारवाईचे निर्देश दिले त्यानंतर जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार, पोलिस अधीक्षक रितु खोकर यांनी कारवाई केली. कला केंद्र बंद झाली असल्याने उपासमार होऊ नये यासाठी तिथे असलेल्या महिला, कलाकार यांच्याबाबत सुद्धा जिल्हाधिकारी यांनी सकारात्मक भुमिका घेतली आहे. त्यांचे पुनर्वसन करण्यासाठी त्यांना रोजगार, उद्योग प्रशिक्षण, विविध शासकीय योजना लाभ देण्याचे व त्यासाठी विशेष शिबीर आयोजित करण्याची तयारी दर्शवली आहे.
6 कला केंद्राना सील ठोकण्यात आले असले तरी काही ठिकाणी छुप्या पद्धतीने ‘छमछम’ अधुन मधुन सुरु असते त्यामुळे ती रोखणे हे प्रशासनासमोर एक मोठे आव्हान असणार आहे. ज्यांना अद्याप सील केले नाही ते सील करणे गरजेचे आहे. काही स्थानिक पोलिस व महसुल अधिकारी, कर्मचारी यांच्यासह काही गाव पुढारी यांचे पाठबळ त्यांना मिळतो हे वास्तव आहे.
कला केंद्र व्यवसायात काही ठराविक मंडळी आहेत जे वेगवेगळे प्रस्ताव सादर करतात, धाराशिव जिल्ह्यात 6 कला केंद्र परवाने रद्द केले असले तरी नवीन 6 प्रस्ताव सादर केले आहेत. देवी देवातांची नावे देऊन कलेच्या नावाखाली अनेक चुकीचे प्रकार झाल्याचे पोलिस कारवाईत समोर आले आहे.
बाबासाहेब घाटे यांचा ‘पिंजरा’ तर अक्षय साळुंके यांच्या ‘महाकाली’ कला केंद्राचा परवाना कायमस्वरूपी रद्द केला आहे त्यांनी नव्याने अर्ज केला आहे. घाटे व साळुंके यांनी ‘नटरंग’ तर अरविंद गायकवाड यांनी तुळजापूर तालुक्यातील धनगरवाडी येथील ‘चंद्राई’ कला केंद्र, कळंब तालुक्यातील वडगाव ज येथे ‘अंबिका’ कला केंद्रासाठी येडशी येथील नानासाहेब पवार यांनी, वडगाव ज येथे ‘रेणुका’ कला केंद्रासाठी येडशी येथील सतीश वामन जाधव यांनी, आळणी येथे ‘प्यासा’ केंद्र सुरु करण्यासाठी श्रीपाल वीर व भाटशीरपुरा येथील शितल गायकवाड यांनी प्रस्ताव सादर केले आहेत. त्यातील अनेक प्रस्तावात त्रुटी असल्याने एकही नवीन परवाना दिलेला नाही.
धाराशिव जिल्ह्यातील काही भाग हा कला केंद्राचा ‘अड्डा’ बनत चालला होता, मात्र त्याला वेळीच आळा घालण्यात प्रशासनाला यश आले. ‘कला केंद्र युक्त’ ते ‘कला केंद्र मुक्त’ यात अपर जिल्हा दंडाधिकारी तथा निवासी उप जिल्हाधिकारी विद्याचरण कडवकर, धाराशिवचे उप विभागीय दंडाधिकारी ओंकार देशमुख, कळंब विभागाचे उपविभागीय दंडाधिकारी गणेश शिंदे, धाराशिव तहसीलदार मृणाल जाधव,वाशी तहसीलदार प्रकाश मेहेत्रे, कळंब तहसीलदार हेमंत ढोकळे, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक विनोद इज्जपवार यांच्यासह इतर पोलिसांची भुमिका महत्वाची ठरली. दैनिक समय सारथी वृत्तपत्राने याबाबत पाठपुरावा करीत वस्तुस्तिथी मांडली. धाराशिवच्या इतिहासात प्रथमच सर्व कला केंद्र परवाने रद्द झाल्याने जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांच्यासह प्रशासनाचे कौतुक अभिनंदन होत आहे.













