धाराशिव – समय सारथी
धाराशिव जिल्ह्यातील शिवसेना शिंदे गटाची सर्व कार्यकारिणी बरखास्त करण्यात आली असुन त्यानंतर शिवसेनेचे नेते सुरज साळुंके, अविनाश खापे यांच्यासह अन्य जणांनी प्रतिक्रिया देत हा शिवसेनेसाठी सुवर्णक्षण आहे असे म्हणाले. भगवान के दर पे देर है, अंधेर नही अशी पोस्ट सुरज साळुंके यांनी केली. धाराशिव कळंब तुळजापूर यासाठी सुरज साळुंके, ऋषी मगर, सोमनाथ गुरव यांच्यासह अनेक जण उत्सुक आहेत. उद्धव ठाकरे हे 28 जुनला धाराशिव दौऱ्यावर येत असुन त्यापुर्वी या निवडी व अनेक घडामोडी होऊ शकतात. जुन्या नवीनचा समन्व्य साधने एक आव्हान असणार आहे.
खासदार ओमराजे निंबाळकर यांच्या पक्ष प्रवेशानंतर मोठ्या घडामोडी घडण्यास सुरुवात झाली आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशाने सचिव संजय मोरे यांनी कार्यकारणी बरखास्त केली आहे. शिवसेना, युवासेना, महिलासेना आणि अंगीकृत सर्व संघटनेची कार्यकारिणी बरखास्त करण्यात आली आहे. 2 दिवसापुर्वी प्रभारी जिल्हाध्यक्ष अजित पिंगळे यांनी धाराशिव शहरातील काही पदाधिकारी यांच्या निवडी केल्या होत्या त्यानंतर काहीसा गोंधळ निर्माण झाला होता.
पिंगळे व आमदार राणाजगजीतसिंह पाटील यांच्या मधुर संबंधावर अनेक वेळा शिवसैनिकांनी आरोप केले होते. आमदार राणाजगजीतसिंह पाटील शिवसेना शिंदे गट चालवीत असल्याचा व त्यांच्या मर्जीनुसार जिल्हा परिषद व नगर परिषद निवडणुकीत शिवसेनेचे एबी फॉर्म व उमेदवार दिल्याचा आरोप झाला होता.
पालकमंत्री प्रतापराव सरनाईक, आमदार प्रा डॉ तानाजीराव सावंत, खासदार ओमराजे निंबाळकर यांच्या नेतृत्वात नवीन कार्यकारणी लवकरच जाहीर करण्यात येणार आहे.











