धाराशिव – समय सारथी
लोहगड किल्ल्यावरून पाय घसरून पडल्याचा बनाव रचत करण्यात आलेल्या केतन अग्रवाल या तरुण व्यावसायिकाच्या मृत्यू प्रकरणाला आता धक्कादायक वळण मिळाले आहे. हा अपघात नसून केतनची होणारी पत्नी सिया गोयल हिने तिच्या प्रियकराच्या मदतीने थंड डोक्याने केलेला खून असल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे.
पोलिसांनी दोन्ही मुख्य आरोपींना ताब्यात घेतले असून त्यांनी आपला गुन्हा कबूल केला आहे. अग्रवाल हे प्रतिष्ठित व्यापारी असुन त्यांच्या लग्नासाठी वडिलांनी राजस्थान येथील उदयपुर येथे जय्यत तयारी करीत 17 कोटींचा पॅलेस व 2 प्रायव्हेट जेट बुक केले होता. नोव्हेंबर 2026 मध्ये हे लग्न होणार होते मात्र त्या पुर्वीच हत्या झाली.
केतन अग्रवाल हा लोहगड किल्ल्यावरून खाली कोसळल्याची घटना घडल्यानंतर सुरक्षारक्षक, पोलीस आणि मुलीच्या घरच्यांच्या उपस्थितीत लोणावळा ग्रामीण पोलीस ठाण्यात सुरुवातीला कलम 194 अंतर्गत अकस्मात मृत्यूची (AD No. 36/2026) नोंद करण्यात आली होती. केतन हा एक नियमित ट्रेकर होता आणि त्याने यापूर्वी अनेक ट्रेक्स केले होते. त्यामुळे त्याचा असा अचानक पाय घसरणे पोलिसांना संशयास्पद वाटत होते. त्यानंतर केतनच्या कुटुंबीयांनीही या मृत्यूबाबत तीव्र संशय व्यक्त करत पोलिसांकडे तक्रार दाखल केली.
तांत्रिक पुरावे आणि ‘लव्ह ट्रँगल’ उघड –
पोलिसांनी गोपनीय माहिती, साक्षीदार आणि तांत्रिक पुराव्यांच्या (CDR, IPDR Analysis आणि CCTV फुटेज) आधारे सखोल तपास सुरू केला. यामध्ये धक्कादायक बाब समोर आली की, सिया गोयल हिचे पुणे मार्केट यार्ड परिसरात दुकान असलेल्या चेतन चौधरी नावाच्या तरुणासोबत गेल्या एका वर्षापासून प्रेमसंबंध होते.
सियाला केतनसोबत लग्न करायचे नव्हते. या विवाहबंधनात केतन आडकाठी ठरत असल्याने सिया आणि चेतन या दोघांनी मिळून त्याला वाटेतून हटवण्याचा पूर्वनियोजित कट रचला. याप्रकरणी लोणावळा ग्रामीण पोलिसांनी कलम 103 (BNS) आणि 61(2) अंतर्गत खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपासात आरोपींनी गुन्ह्याची कबुलीही दिली असल्याची माहिती पोलिसांनी दिली.











