धाराशिव – समय सारथी
धाराशिव शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अंतर्गत असलेल्या स्त्री रुग्णालयात हलगर्जीपणामुळे बाळ दगावल्याची घटना घडल्यानंतर एका डॉक्टरला निलंबित करण्यात आले आहे. वैद्यकीय अधीष्ठाता डॉ शैलेंद्र चौहान यांनी स्त्री रोग तज्ज्ञ डॉ तृप्ती राडकर यांच्यासह चतुर्थ श्रेणी कर्मचारी सौरभ जाधव याला निलंबीत केले आहे.
स्त्री रुग्णालयात तुळजापूर येथील कवीता प्रवीण जगताप ह्या प्रसूतीसाठी दाखल झाल्या होत्या. 5 जून रोजी महिलेची प्रसूती झाली मात्र प्रसुती दरम्यान बाळाचा मृत्यू झाला. 8 जून रोजी कविता जगताप यांच्या नातेवाईकांनी याप्रकरणी रुग्णालय प्रशासनाकडे लेखी तक्रार केली आहे. नातेवाईकांच्या आरोपानुसार प्रसूती दरम्यान डॉक्टरांकडे वारंवार सिझर करण्याची मागणी केली होती. मात्र वेळेत सिझर केले नाही. प्रसुतीदरम्यान महिला डॉक्टरासोबतच्या एका पुरुष कर्मचाऱ्याने मातेचे पोट जोरात दाबल्याने बाळाचा मृत्यू झाल्याचा गंभीर आरोपही तक्रारीत केला आहे.











