धाराशिव – समय सारथी
परंडा येथील तहसीलदार निलेश काकडे यांची गाडी अडवून त्यांच्यावर हल्ला केल्याची घटना घडली असुन याप्रकरणी योगेश मेटकरी यांच्यावर गुन्हा नोंद करण्यात आला आहे. आरोपीवर कारवाई करावी या मागणीसाठी महसूल अधिकारी व कर्मचारी संघटना आक्रमक झाल्या असुन त्यांनी काम बंद व बेमुदत सामूहिक रजेचा इशारा दिला आहे. मेटकरी यांनी एक तक्रार दिली होती त्यावर लगेच कारवाई करा असे म्हणत गाडी अडवून जीवे मारण्याची धमकी दिली.
तहसीलदार काकडे हे कार्यालयीन कामकाजानंतर चांदणी नदीकडे अवैध वाळु उत्खन्न चालु असल्याची गुप्त माहिती मिळाल्यानंतर कारवाई करण्यासाठी नितिन भांडवलकर, (सहाय्यक महसुल अधिकारी) पवन लांडगे (महसुल सहाय्यक) मोहसिन पठाण (महसुल सहाय्यक) हे चारचाकी गाडीने जात असताना तहसील कार्यालयाच्या मुख्य गेटवर योगेश मेटकरी व अन्य एक व्यक्तीने गाडी अडवली. त्यानंतर शिवीगाळ करीत गाडीच्या काचावर जोरदार बुक्या मारल्या. तक्रारीवर तुम्ही काय कार्यावाही केली त्यावेळी मी त्यांना तुम्ही दिलेल्या तक्रारीवर चौकशी चालु आहे. योग्य ती कार्यवाही होईल असे म्हणत असताना देखील अंगावर धावून येत जीवे मारण्याची धमकी दिली व हुज्जत घातली.
काकडे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून भारतीय न्याय संहिता कलम 132,221,224,126(2),351(2), 352, महाराष्ट्र पोलीस अधिनियम 3(5),110,112 व 117 यानुसार गुन्हा नोंद करण्यात आला आहे. सहायक पोलिस निरीक्षक प्रवीण शीरसाठ हे तपास करीत आहेत.
हल्ल्याच्या निषेधार्थ शुक्रवारी 17 एप्रिल रोजी तहसिल कार्यालय, परंडा येथील कर्मचारी यांनी कामबंद आंदोलन व कारवाई न झाल्यास सोमवार पासून बेमुदत सामुहिक रजेचा इशारा दिला आहे.












