धाराशिव – समय सारथी
बहुजन योद्धा सामाजिक संघटनेच्या बोधिसत्व, विश्वभूषण डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समितीच्या वतीने धाराशिव शहरात 22 एप्रिल रोजी सायंकाळी भव्यदिव्य मिरवणूक काढण्यात येणार आहे. तसेच दरवर्षीप्रमाणे यंदाही विविध सामाजिक उपक्रमांनी जयंती उत्सव सोहळा साजरा करण्यात येणार आहे. यंदाच्या मिरवणुकीला मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील उपस्थित राहून मिरवणुकीचे उद्घाटन करणार असल्याची माहिती बहुजन योद्धा सामाजिक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष तथा जयंती समितीचे मार्गदर्शक धनंजय (नाना) शिंगाडे यांनी दिली.
धाराशिव शहरातील शासकीय विश्रामगृहात पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष प्रवीण सूर्यवंशी, कार्याध्यक्ष सुधीर पवार, बलराज रणदिवे,, मसूद शेख, माजी नगरसेवक खालील सय्यद, नगरसेवक अजहर मुजावर, आयाज शेख, सतीश कदम, रोहीत पडवळ, लक्ष्मण माने, पांडू भोसले, अभिजित सूर्यवंशी आदी उपस्थित होते.
शिंगाडे यांनी सांगितले की, बहुजन योद्धा सामाजिक संघटनेमार्फत गेली 32 वर्षापासून धाराशिव येथे विविध समाजोपयोगी कार्यक्रमाने जयंती उत्सव साजरा करण्यात येतो. महापुरुषांचे विचार सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहचविण्याचे कार्य संघटना सातत्याने करत आहे .मिरवणुकीत महिला, पुरूष, युवक मोठ्या संख्येने सहभागी होतात.
विशेष म्हणजे जयंती उत्सव समितीमध्ये सर्व जाती-धर्मातील व्यक्तींचा समावेश असून दरवर्षी आगळ्यावेगळ्या पद्धतीने विशेषतः पारंपारिक वाद्यांच्या गजरात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेची भव्य दिव्य मिरवणूक काढण्यात येते. तसेच रक्तदान शिबिर, आरोग्य तपासणी शिबिर, रुग्णांना फळे वाटप, वृक्ष लागवड यासह विविध समाजोपयोगी कार्यक्रम आयोजित करण्यात येतात.
जयंती उत्सव समितीच्या वतीने यावर्षी देखील विविध राज्यातील पारंपारिक वाद्य समूहांना आमंत्रित करण्यात आल्यामुळे ही मिरवणूक वैशिष्ट्यपूर्ण ठरणार आहे. सध्या जगात सुरू असलेल्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर जगाला शांततेचा संदेश देणारे तथागत गौतम बुद्ध यांचा देखावा मिरवणुकीचे आकर्षण ठरणार आहे. तसेच जयंती उत्सव समितीच्या वतीने विविध क्षेत्रात भरीव योगदान देणाऱ्या मान्यवरांचा सन्मानपत्र देऊन सत्कार करण्यात येणार आहे.
22 एप्रिल रोजी दुपारी 1 वाजता जिजाऊ चौक येथून मोटारसायकल रॅली काढण्यात येणार आहे. सायंकाळी धाराशिव शहरातील क्रांती चौक भीमनगर येथून भव्यदिव्य मिरवणुकीस प्रारंभ होणार आहे. शहरातील प्रमुख मार्गावरून डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौक येथे मिरवणुकीची सांगता होणार आहे. या भव्यदिव्य मिरवणुकीत सर्व जाती-धर्मातील आंबेडकरी विचारांच्या नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहनही शिंगाडे यांनी केले.











