धाराशिव – समय सारथी
धाराशिव शहरात कर्णकर्कश आवाज करून नियमांचे उल्लंघन करणाऱ्या आयोजक व संबंधित व्यक्तींवर पोलिसांनी कठोर कारवाई करत तब्बल तीन स्वतंत्र गुन्हे दाखल केले आहेत. ध्वनीप्रदूषणाच्या नियमांचा उघडपणे भंग झाल्याने धाराशिव शहर पोलिसांनी तात्काळ हस्तक्षेप करत संबंधितांविरुद्ध डॉल्बी जप्त करीत कठोर कारवाई केली. भारतीय दंड संहिता कलम २२३, २८९, २९२, २९३ तसेच पर्यावरण संरक्षण अधिनियम कलम ३ व १५ आणि ध्वनीप्रदूषण (नियमन व नियंत्रण) नियम २००० अंतर्गत कलम ३, ४, ५, ६ अन्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती मिरवणुकीदरम्यान काही आयोजकांनी पोलीस प्रशासनाने दिलेल्या स्पष्ट सूचनांकडे दुर्लक्ष करून पारंपारिक वाद्यांऐवजी वाहनांवर (टॉप व बस) डॉल्बी डीजे सिस्टीमचा वापर केला. विशेष म्हणजे, या साउंड सिस्टीमचा आवाज निश्चित ध्वनीमर्यादेपेक्षा अधिक ठेवून कर्णकर्कश पद्धतीने वाजविण्यात आल्याचे निदर्शनास आले.
सम्यक चिलवंत, सागर गायकवाड, अभिषेक सूर्यवंशी, सोमेश्वर मोरे, दत्ता धावारे, साई साखरे, निलेश जानराव, फैयाज पठाण, दर्शन माळाळे, विवेक भोसले, गौतम सोनवणे, प्रणव कोतवाल, सिद्धांत बनसोडे, आकाश लंके, चेतन मस्के, दयानंद पाटील, निखील मंजुळे, भगिरथ कोबरणे, फरदीन कुरेशी, संकेत पाटील, एजाज शेख, नामदेव राऊत, आमन कठारे, विशाल वाघमारे, हसन शेख, साईराज इंगळे, गोपाळ अकोळे, करण नागटिळक, किरण निकम, रोहित शिंगाडे, गोविंद ढेरंगे, देवदत्त लोमटे, प्रतिक लांडगे, अर्जुन माळाळे, संकेत बाबर, प्रविण सिरसाटे, मस्तान शेख, उमेश माने, संकेत जगदाळे, किशोर नागटिळक, अविनाश गोंगावले आदींसह अनेकांवर गुन्हे नोंद करण्यात आले आहेत.
सण-उत्सव साजरे करताना कायद्याचे पालन करणे अत्यावश्यक आहे आणि नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांना कोणतीही सूट दिली जाणार नाही. विशेषतः ध्वनीप्रदूषणासारख्या गंभीर विषयावर पोलिसांनी घेतलेली ही कठोर भूमिका नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण मानली जात आहे, हा संदेश पोलिसांनी दिला.
दरम्यान, अनेक नागरिकांनी पोलिसांच्या या कारवाईचे स्वागत केले असून, भविष्यातही अशा प्रकारच्या नियमभंगावर कठोर कारवाई सुरूच ठेवावी, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. शहरातील शांतता, सुव्यवस्था आणि सार्वजनिक आरोग्य जपण्यासाठी धाराशिव पोलिसांचे हे पाऊल निश्चितच कौतुकास्पद ठरत आहे.












