धाराशिव – समय सारथी
वाशी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील मांडवा येथील पारधी पिढी परिसरात सुरू असलेल्या तिरट जुगार अड्ड्यावर स्थानिक गुन्हे शाखेने मध्यरात्री धाड टाकत मोठी कारवाई केली. या कारवाईत तब्बल 22 जुगाऱ्यांना रंगेहात पकडून 2 लाख 46 हजार 600 रुपयांची रोकड, 15 मोबाईल, जुगाराचे साहित्य आणि चारचाकी वाहन असा एकूण 17 लाख 26 हजार 600 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 25 सप्टेंबर रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक विनोद इज्जपवार यांना मांडवा येथील पारधी पिढी परिसरात लाखो रुपयांचा तिरट जुगार सुरू असल्याची गोपनीय माहिती मिळाली. परिसराची संवेदनशीलता लक्षात घेऊन पोलिसांनी नियोजनबद्ध पद्धतीने कारवाईची तयारी केली. यासाठी स्थानिक गुन्हे शाखेचे अधिकारी व अंमलदार, जलद प्रतिसाद पथक तसेच दंगा नियंत्रण पथकाची मदत घेण्यात आली.
पोलिस पथकाने अचानक जुगार अड्ड्यावर छापा टाकताच जुगाऱ्यांची धावपळ उडाली. मात्र, पोलिसांनी कारवाई करत 22 जणांना ताब्यात घेतले. घटनास्थळावरून रोकड, मोबाईल व वाहनासह मोठ्या प्रमाणात मुद्देमाल जप्त करण्यात आला. याप्रकरणी वाशी पोलिस ठाण्यात जुगार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करून पुढील कारवाई सुरू करण्यात आली आहे.
दरम्यान, कारवाईतील संतोष रमेश काळे (रा. मांडवा) हा 14 चोरीच्या गुन्ह्यांत पोलिसांना पाहिजे असल्याची माहिती पोलिसांनी दिली. तसेच अतुल कालिदास काळे (रा. कन्हेरवाडी पाटी) हा वाशी पोलिस ठाण्यातील दरोड्याच्या गुन्ह्यात पाहिजे आरोपी असल्याचे सांगितले.
ही कारवाई पोलिस अधीक्षक रित खोखर व अपर पोलिस अधीक्षक सचिन पांडकर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक विनोद इज्जपवार यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली. स्थानिक गुन्ह शाखेचे सपोनि सचिन खटके, पोलीस हवालदार विनोद जानराव, नितीन जाधवर, बबन जाधवर, पुष्कर मुंगळे, दत्ता राठोड, दया गादेकर, अशोक ढगारे, योगेश कोळी चापोह महेबुब अरब, चापोशि केदार व आरसीपी, क्यूआरटी पथकातील अंमलदार यांचे पथकान 2 केली आहे. या धडाकेबाज कारवाई मुळ अवैध धंद चालकांच धाबे दणाणले आहेत.











