स्वतःचे काही नगरसेवक विकत घेण्याची वेळ – सत्ता, लिलाव, बोली अन बाजार
धाराशिव – समय सारथी
शिवसेना उबाठा गटातील 4 नगरसेवक पक्ष सोडून शिवसेना शिंदे गटात गेल्यानंतर शिवसेना शिंदे गट व भाजप, पर्यायाने राजेनिंबाळकर आणि पाटील हा पारंपरिक वाद अधिक तीव्र झाला आहे. धाराशिव शहरातील समता नगर भागातील उबाठा गटाचे प्रभाग क्रमांक 9 चे नगरसेवक नाना घाडगे हे शिंदे गटात गेल्यानंतर भाजपने त्या प्रभागात बॅनर लावले आहेत. भाजप नगरसेवक सुजित साळुंके यांनी हे बॅनर लावुन भावना व्यक्त केल्या आहेत.
1 कोटींचा गद्दार, हा शिक्का पुसला जाणार नाही. 1 खोका मतदाराला दिला धोका, क्लीन समताचा दाढीवाला बोका.. आमचं मत आम्हाला परत द्या.. सोसायटी लुटली, तिजोरी फोडली, 1 कोटी घेऊन निष्ठा विकली.. अश्या स्वरूपाचा आशय असलेले हे बॅनर लावण्यात आले आहेत. या बॅनरबाजी नंतर वाद पेटला आहे.
एरव्ही संथ गतीने काम करणाऱ्या नगर परिषदेने हे बॅनर हटवण्याची मोहीम हाती घेतली आहे. राजकीय नेत्यांच्या फोनाफोनी नंतर नगर परिषद आता हे बॅनर सन्मानाने उतरवीत आहे. 2029 ची लोकसभा व विधानसभा डोळ्यासमोर ठेवून आणि विकास निधीतील वाटा यातून इतर पक्षाचे सदस्य फोडाफोडी करताना भाजपचे जुने शिलेदार मात्र नाराज होत असल्याचे वास्तव आहे. नवीन आलेल्याना मान, दाम व खुर्ची.. ते तुपाशी अन आम्ही मात्र उपाशी अशी भावना व प्रतिक्रिया धाराशिव, तुळजापूर येथे व्यक्त होत आहे.
धाराशिव नगर परिषदेत स्पष्ट बहुमत असतानाही भाजपने शिवसेना उबाठा गटाचे नगरसेवक फोडण्याची खेळी केली होती मात्र ती त्यांच्या चांगलीच अंगलट आली. भाजपकडे 5 नगरसेवक जाणार होते याची जबाबदारी काही जणांवर दिली होती मात्र यंत्रणा फुसकी व अकार्यक्षम ठरल्याने तोंडावर पडले. हेच नगरसेवक भाजपमध्ये आले असते तर त्यांच्या स्वागताचे बॅनर लावण्याची वेळ निष्ठावंत कार्यकर्त्यांवर आली असती. कळंब नगर परिषदेत जे केले त्याला काय म्हणायचे याचे उत्तर भाजप नेतृत्वाकडे नाही. यश आल्यावर चाणक्यनिती असा ‘उदोउदो’ तर पराभवाचे ‘खापर’ कोणावर फोडणार व श्रेय कोण घेणार ? अशी चर्चा आहे.
5 पैकी 4 नगरसेवक शिवसेना शिंदे गटात घेण्यात खासदार ओमराजे निंबाळकर यांना यश आले. 4 पैकी काही नगरसेवक यांनी उपद्रव मूल्य दाखवीत दरपत्रक वाढवीत घोडेबाजार केला. स्वतः पक्ष तिकीट देऊन, जीवाचे रान करून प्रचार करीत निवडून आणलेले काही नगरसेवक ‘लक्ष्मी दर्शन’ करून सत्तेच्या लिलावत ‘विकत’ घेण्याची वेळ खासदार ओमराजे यांच्यावर आली. तोंड दाबून बुक्यांचा मार सध्या ओमराजे सहन करीत असुन काहींचे ‘लाड’ पुरवीत आहेत.












