धाराशिव – समय सारथी
तुळजापूर शहरातील विविध भागात सुरू असल्याचा आरोप असलेल्या मटका, जुगार, हातभट्टी, ताडी, दारू विक्री तसेच अमली पदार्थांच्या कथित अवैध व्यवसायांवर तातडीने कारवाई करावी, अशी मागणी नगराध्यक्ष विनोद विलासराव गंगणे यांच्यासह शिष्टमंडळाने निवेदनाद्वारे केली आहे. तुळजापूर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक आण्णासाहेब माजरे यांना लेखी निवेदन देत 3 दिवसांचा अल्टीमेटम दिला आहे.
शहरातील काही भागांत आवश्यक परवानगी व नियमांचे पालन न करता विविध व्यवसाय सुरू असल्याचा दावा निवेदनात करण्यात आला आहे. या कथित अवैध धंद्यांमुळे शहरातील कायदा व सुव्यवस्था, नागरिकांची सुरक्षितता तसेच सार्वजनिक आरोग्यावर विपरीत परिणाम होण्याची शक्यता असल्याचे नगराध्यक्ष गंगणे यांनी नमूद केले आहे.
पोलिस प्रशासनाने तातडीने पाहणी करून व्यवसायांची कागदपत्रे, परवाने आणि इतर आवश्यक बाबींची तपासणी करावी. परवानगी नसल्याचे किंवा नियमांचे उल्लंघन होत असल्याचे आढळल्यास संबंधित व्यवसाय बंद करून कायद्यानुसार कारवाई करावी, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे. भविष्यात अशा प्रकारचे व्यवसाय पुन्हा सुरू होऊ नयेत, यासाठी नियमित तपासणी व आवश्यक प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याची मागणीही करण्यात आली आहे.
तीन दिवसांच्या आत कारवाई करून संबंधित अवैध व्यवसायांच्या मूळ मालकांवर गुन्हे दाखल करावेत; अन्यथा नगराध्यक्षांसह सर्व नगरसेवकांच्या उपस्थितीत आमरण उपोषण करण्यात येईल, असा इशारा निवेदनातून देण्यात आला आहे. उपनगराध्यक्ष रामचंद्र रोचकरी, भाजप तालुकाध्यक्ष आनंद कंदले, नगरसेवक माऊलीराजे भोसले, माजी नगरसेवक किशोर साठे, विजय कंदले, सुनील रोचकरी, मधुकर शेळके, सागर कदम, सज्जनराव साळुंके, दादासाहेब खपले, माजी नगराध्यक्ष पंडितराव जगदाळे, लखन पेंदे, नरेश काका अमृतराव, नगरपरिषद गटनेते औदुंबर कदम, आनंद सावंत, दिनेश क्षीरसागर, रत्नदीप भोसले, मनोज गवळी आदी उपस्थित होते.











