धाराशिव – समय सारथी
आमदार राणाजगजीतसिंह पाटील यांच्या अवमानानंतर भाजपा नेते प्रदेश कार्यकारिणी सदस्य ॲड अनिल काळे यांनी परंडा येथे भाजपा संपर्क कार्यालयात माजी आमदार सुजितसिंह ठाकूर यांची सदिच्छा भेट घेतली. झालेला अवमान काळे यांच्यासह निष्ठावंत कार्यकर्ते यांच्या चांगलाच जिव्हारी लागला असुन त्यांनी गाठीभेटी व मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे. काळे यांनी नाराज व पिडीत गटाची मोट बांधण्यासाठी मोहीम सुरु केली असुन रणनिती आखली आहे.
काळे यांनी सोशल मीडियावर भेटीचे फोटो पोस्ट करीत माहिती दिली. ठाकूर यांच्याशी पक्ष संघटना आणि विविध विषयांवर संवाद झाला. संघटन, कार्यकर्त्यांच्या भावना, आगामी उपक्रम, जनहिताच्या विविध विषयांवर सविस्तर चर्चा झाली अशी पोस्ट दोघांनी केली. दरम्यान माजी जिल्हाध्यक्ष संताजी चालुक्य यांच्यासह अनेक मंडळी विविध कारणाने नाराज असुन ती उघडपणे व्यक्त होत आहेत.
पाटील यांचा धाराशिव जिल्ह्यात एक कलमी कार्यक्रम सुरु असुन त्यांच्या सरंजामशाहीला अनेक जण कंटाळले असुन आम्ही आता सगळ्यांची मोट बांधत आहोत असे काळे म्हणाले. निष्ठावंत कार्यकर्ते हे यांचे लाभार्थी नसुन त्यांना मान आणि सन्मान हवा आहे. आमचा संघर्ष व तपस्या अमुल्य आहे, पक्ष कार्यकर्ते वाढवावेत, वयक्तिक समर्थक नकोत असे काळे भेटीनंतर म्हणाले. संपत्तीच्या जोरावर यांचे ‘हॉली डे’ पॉलिटिक्स असुन घराणेशाहीची लादली आहे, हे मान्य केले जाणार नसल्याचे ते म्हणाले. पक्ष कार्यकर्ते ऐवजी ते वैयक्तिक समर्थक वाढवत असल्याचा आरोप काळे यांनी केला.
भाजपमधील नाराज गट हा सध्या सक्रीय झाला असुन आगामी काळात शिष्टमंडळ मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्ष सह इतर नेत्यांची भेट घेणार आहे, दरम्यान आमदार राणाजगजीतसिंह पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सह्याद्री येथे भेट घेतल्याची माहिती असुन भेटीचा तपशील समोर आलेला नाही.











