मध्यम प्रकल्प विभागातील प्रकार चौकशीची मागणी
धाराशिव – समय सारथी
धाराशिव जिल्हा प्रशासनात सध्या एका ‘सुपर कार’ ची जोरदार चर्चा असुन ही या कारने एकाच वेळी धाराशिव ते मुंबई व धाराशिव ते संभाजीनगर असा विक्रमी प्रवास केला आहे. MH 25 P2 9900 असा या कारचा नंबर असुन 28 मार्च 2022 रोजी धाराशिव ते मुंबई परत असा 1 हजार 440 व धाराशिव ते संभाजीनगर परत असा 640 किमीचा एकाच दिवशी कागदोपत्री प्रवास केला आहे.
‘माऊली इंटरप्राईजेस’ आणि ‘माऊली टूर अँड ट्रॅव्हल्स’च्या नावाने बोगस बिले तयार करून शासकीय निधीचा अपहार केल्याचा आरोप तक्रारदार सुरज महादेव माळी यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे दिलेल्या निवेदनातून केला आहे. या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करून फौजदारी गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी निवेदनाद्वारे केली आहे.
माळी यांनी दिलेल्या निवेदनानुसार, ‘माऊली इंटरप्राईजेस, धाराशिव’च्या नावाने 250 प्रिंटर टोनरचा पुरवठा दाखवून तब्बल 11 लाख 50 हजार 500 रुपयांचे बिल काढण्यात आल्याचा दावा करण्यात आला आहे. संबंधित फर्म प्रत्यक्षात अस्तित्वात आहे का, वर्क ऑर्डर, पावती, पुरवठा आणि बिलाची नोंद यांची चौकशी करावी, अशी मागणी तक्रारदाराने केली आहे.
‘माऊली टूर अँड ट्रॅव्हल्स, आळणी’च्या नावाने 17 लाख 71 हजार 63 रुपयांचा आर्थिक व्यवहार करण्यात आल्याचा आरोप निवेदनात करण्यात आला आहे. विशेष म्हणजे, संबंधित फर्म आपल्या नावाचा गैरवापर करून तयार करण्यात आल्याचा दावा तक्रारदाराने केला आहे.
एकाच वाहन क्रमांकाची एकाच दिवशी मुंबई आणि संभाजीनगर अशा दोन वेगवेगळ्या ठिकाणी वापर झाल्याचे दाखवण्यात आल्याचा दावा तक्रारदाराने केला आहे. तसेच काही प्रवासांमध्ये प्रत्यक्ष अंतरापेक्षा मोठ्या प्रमाणात किलोमीटर दाखवून शासकीय निधीचा गैरव्यवहार झाल्याचा आरोप करण्यात आला आहे.
तक्रारदाराच्या म्हणण्यानुसार, काही बिले व कागदपत्रांवर बनावट स्वाक्षरी आणि शिक्क्यांचा वापर करून मुद्रा बँकेमार्फत आर्थिक व्यवहार करण्यात आल्याचा संशय आहे. त्यामुळे संबंधित सर्व बिलांची, वर्क ऑर्डरची, पावत्यांची, एमबी नोंदींची, वाहन वापराच्या नोंदींची आणि बँक व्यवहारांची स्वतंत्रपणे तपासणी करण्याची मागणी करण्यात आली आहे.











