धाराशिव – समय सारथी
धाराशिव शहरातील BLO यांनी राजकीय पक्षाच्या ऑफिसमध्ये बसून SIR चे काम केल्याची तक्रार भारतीय जनता पार्टीने जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी कीर्ती किरण पुजार यांच्याकडे केली आहे. धाराशिव – कळंब विधानसभा मतदार संघांचे प्रमुख ऍड दत्तात्रय देवळकर व जिल्हा सरचिटणीस ऍड नितीन भोसले यांनी लेखी तक्रार केली आहे.
धाराशिव शहरामध्ये SIR चे फॉर्म वितरण करणे व मतदाराकडून फॉर्म भरून घेणे हि प्रक्रिया निवडणूक विभागाकडून राबविली जात आहे. या मध्ये BLO कडून संबंधित मतदाराच्या घरी जाऊन फॉर्म देणे व भरून घेणे हे बंधनकारक आहे. जेणेकरून प्रत्यक्षात मतदारांची पडताळणी नियमाप्रमाणे होण्यास मदत होईल.
धाराशिव शहरातील यादी भाग क्रमांक 333 मध्ये BLO सय्यद जुनेद कादरी हे एका राजकीय पक्षाच्या कार्यालयात बसून SIR चे काम करत असल्याचे निदर्शनास आले आहे. तश्या प्रकारच्या बातम्या वर्तमानपत्रात छापुन आल्या आहेत तसेच समाजमाध्यमावर त्याचे व्हिडीओ प्रसिद्ध झाले आहेत. वास्तविक त्यांनी प्रत्येक घरी जाऊन नोंदणी करणे अपेक्षित आहे मात्र तसे दिसून येत नाही.
निवडणूक आयोगाने दिलेल्या सुचनाचे पालन न करता एका राजकीय पक्षाच्या ऑफिसमध्ये बसून त्यांनी कर्तव्यात कसूर केले आहे. यामुळे चुकीची मतदार नोंदणी होऊ शकते त्यामुळे त्यांच्यावर योग्य ती कार्यवाही करण्याची मागणी केली आहे.











