धाराशिव – समय सारथी
विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीला सुरुवात होणार असुन उस्मानाबाद कळंब येथे महायुतीचे शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार अजित पिंगळे व महाविकास आघाडीचे शिवसेना उबाठा गटाचे उमेदवार तथा विद्यमान आमदार कैलास पाटील यांच्यात थेट दुरंगी लढत होत आहे. आमदार कैलास पाटील हे दुसऱ्यांदा विधानसभा मतदार संघात निवडणूक लढवीत आहेत तर अजित पिंगळे हे पहिल्यादा निवडणूक लढवीत आहेत त्यामुळे या लढतीकडे लक्ष लागले आहे. इथे धनुष्यबाण विरुद्ध मशाल अशी लढत आहे.
उस्मानाबाद कळंब विधानसभा मतदार संघात शहरी भागात 110, ग्रामीण भागात 306 असे सर्वाधिक 416 मतदान केंद्र असुन 14 टेबलवर मतमोजणीचे 30 राऊंड होतील तर पोस्टल मतमोजणीचे 5 राऊंड होतील. 2019 च्या विधानसभा निवडणुकीत उस्मानाबाद कळंब येथून कैलास पाटील हे 13 हजार 467 मतांनी विजयी झाले होते, त्यांना 87 हजार 488 मते पडली होती. 2024 विधानसभा निवडणुकीत 2 लाख 38 हजार 890 इतके मतदान झाले आहे.
उस्मानाबाद कळंब विधानसभा मतदार संघात 3 लाख 74 हजार 768 मतदारापैकी 2 लाख 38 हजार 840 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला त्यात 1 लाख 11 हजार 708 महिला तर 1 लाख 27 हजार 127 पुरुषांनी मतदान केले, महिलांची टक्केवारी 62.62 तर पुरुषांचे 64.74 टक्के मतदान झाले.धाराशिव जिल्ह्यातील उमरगा, तुळजापूर, उस्मानाबाद कळंब व भुम परंडा विधानसभा मतदार संघासाठी 1 हजार 523 मतदान केंद्रावर 20 नोव्हेंबरला मतदान झाले आहे, त्याची मतमोजणी सुरु आहे.