धाराशिव – समय सारथी
धाराशिव जिल्हा परिषद अंतर्गत पदोन्नतीने पदस्थापना देण्यासाठी 3 जुलै रोजी प्रक्रिया होणार असुन याला शिक्षक संघटनाचा विरोध आहे. 2 वर्ष रखडलेली प्रक्रिया एका दिवसात पत्र काढुन राबविण्याचे कारण व धोरण काय ? यासह अन्य मुद्यावर प्रश्न उपस्थितीत केला आहे.
प्राथमिक शिक्षक, प्रा.प, विषय शिक्षक या संवर्गातुन विस्तार अधिकरी श्रेणी 2, विस्तार अधिकरी श्रेणी 3, समुह साधन केंद्र समन्वयक (केंद्रप्रमुख) व मुख्याध्यापक या पदावर पदोन्नती मुळे पदस्थापना देण्यासाठी 3 जुलै रोजी 11 वाजता समुपदेशन प्रक्रिया होणार आहे. याबाबतचे पत्र मुख्य कार्यकारी अधिकारी प्रियंवदा म्हाडदळकर व शिक्षक अधिकारी डॉ रवींद्र खंदारे यांनी काढले आहे.
मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या उपस्थितीतीत समुपदेशन प्रक्रिया स्थायी समिती सभागृहात ही प्रक्रिया पार पडणार आहे. पात्र शिक्षक यांनी समुपदेशन प्रक्रियेसाठी सर्व मूळ कागदपत्र व टीईटी प्रमाणपत्रासह वेळेवर हजर राहण्याच्या सुचना देण्यात आल्या आहेत. पदोन्नतीस होकार असलेले जे शिक्षक वेळेवर हजर राहणार नाहीत त्यांना प्रशासनामार्फन पदस्थापना देण्याची कार्यवाही करण्यात येईल व त्याची सर्वस्वी जबाबदारी त्यांची असेल असेही पत्रात नमुद केले आहे.
2010 पूर्वी नियुक्त शिक्षकांना टीईटी अनिवार्य नाही असे प्रतिज्ञापत्र एनसीटीईने न्यायालयात दाखल केल्याचा काही जणांचा दावा आहे. तर जिल्हा परिषद शिक्षकांचे 3 जुलै रोजी प्रमोशन होणार आहे, 2 जुलै रोजी सायंकाळी 6 वाजता पत्र काढून लगेच दुसऱ्या दिवशी प्रक्रिया ठेवली, यामागे हेतू संशयास्पद वाटत आहे. अनेक शिक्षकांना फक्त मुख्याध्यापक केंद्रप्रमुख व विस्ताराधिकारी एवढेच प्रमोशन रिटायरमेंट पर्यंत होण्याची संधी असते, त्यांच्यावर अन्याय होऊ नये.
टीईटीच्या बाबतीत केंद्र सरकार लवकरच निर्णय घेणार आहे, केंद्र सरकार नक्कीच रद्द करणार आहे तसे शपथपत्र त्यांनी सुप्रिम कोर्टात दाखल केलेल आहे. 10 ते 15 दिवसात हा निर्णय रद्द होईल त्यामुळे सर्व शिक्षकांच्या वतीने महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद या पदोन्नतीला विरोध करत आहे,पदोन्नती पुढे ढकलण्यात यावी अशी मागणी महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेचे प्रांत सहकार्यवाह किशोर पिसे यांनी केली आहे. तसेच याबाबत चर्चा करून विरोध करून आंदोलन करण्याचा इशाराही पिसे यांनी दिला.











