धाराशिव – समय सारथी
धाराशिव जिल्ह्यात विद्यार्थ्यांच्या मोफत गणवेश वाटपाची बिले देण्यात न आल्याने मुख्याध्यापकात नाराजीचा सुर आहे. विशिष्ट प्रकार, रंगाचा व आम्ही सुचवलेल्या दुकानातुन गणवेश का खरेदी केला नाही म्हणुन ही बिले थांबवा असे तोंडी फर्मान सोडण्यात आले आहे. मुळात गणवेश खरेदी व निवडण्याचा अधिकार शाळेय व्यवस्थापन समिती आहे मात्र सोलापूर येथील ‘लाडका दुकानदार’ निवडुन त्याच्याकडूनच खरेदी करा असा ‘हट्ट’ धरण्यात आला, ज्यांनी त्याच्याकडुन खरेदी केली नाही त्यांची बिले अडवली आहेत.
मुख्याध्यापकांनी ही बिले स्वतःच्या खिशातून द्यावीत, आम्ही देणार नाही असा पवित्रा घेतला आहे. शिक्षक, मुख्याध्यापक शाळेच्या मुख्यालयी राहत नाहीत हे आम्हाला माहिती आहे, त्यामुळे कारवाई करू असा धमकीवजा इशारा देऊन त्यांना गप्प केले जात आहे. काही संघटना ह्या ‘हेकेखोर’ व ‘अडेलतट्टू’ भूमिकेच्या विरोधात आंदोलनाच्या पवित्र्यात असल्याची माहिती आहे.
सोलापूर येथील एका दुकानदाराची निवड केली असुन त्याचे कापड चांगले आहे, ब्लेजरसह तो देईल असे मार्केटिंग करून त्याच्या नंबरसह मेसेज करण्यात आले. सुरुवातीला विशिष्ट रंगाचे गणवेश घ्या असा आग्रह धरण्यात आला, त्यानंतर आम्ही सांगेल त्याच दुकानातून घ्या असा हट्ट करण्यात आला. शाळा सुरु होण्याच्या पहिल्या दिवशी गणवेश देणे बंधनकारक असल्याने गणवेश खरेदी केली मात्र आता बिले रोखून ठेवली आहेत व ती मुख्याध्यापक यांनी स्वतःच्या खिशातुन द्यावीत यासाठी दबावतंत्र सुरु आहे.
जिल्ह्यातील सर्व शाळेत एकाच रंगाचा, पॅटर्नचा गणवेश ही संकल्पना व हेतू चांगला असला तरी त्याचे नियोजन शाळा सुरु होण्यापुर्वी काही महिने अगोदर करणे गरजेचे होते. एकाच रंगाला मुख्याध्यापक व इतरांची सहमती होती मात्र वेळेत निर्णय कळविला नाही, ऐनवेळी निर्णय लादल्याने गोंधळ उडाला आहे. गणवेशाचे पैसे वर्ग केले असुन बिले सादर करा असे पत्र पाठवून प्रशासकीय सोपस्कार पुर्ण केले तर दुसरीकडे आमचा तोंडी आदेश पाळला नाही म्हणुन मुख्याध्यापकांवर दबाव टाकला जात आहे, दोन्ही बाजुने कोंडी झाली आहे.केंद्र शासनाच्या समग्र शिक्षा कार्यक्रमांतर्गत शासकीय व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमधील इ 1 ली ते इ 8 वी मधील शिक्षण घेत असलेल्या सर्व मुली, अनुसूचित जाती व जमाती प्रवर्गातील मुले तसेच दारिद्र्य रेषेखालील पालकांची मुले यांना मोफत गणवेश योजनेचा लाभ देण्यात येतो. गणवेशाचा रंग व रचनादेखील स्थानिक पातळीवर निश्चित करण्याचे अधिकार शाळा व्यवस्थापन समितीस देण्यात आले आहेत. विद्यार्थ्यांचे गणवेश स्थानिक महिला बचत गटांमार्फत शिवून घेण्याची कार्यवाही करण्यात यावी.
गणवेशाची शिलाई ही स्थानिक महिला बचत गटाकडून करुन घेण्यात यावी. ज्या ठिकाणी स्थानिक पातळीवर महिला बचत गट शिलाईसाठी उपलब्ध नसतील त्या ठिकाणी शाळा व्यवस्थापन समितीने तसे प्रमाणित करुन त्यानंतरच आजुबाजूच्या क्षेत्रातील बचत गटाकडून गणवेश शिलाई करुन घेण्याची कार्यवाही करावी असे शासन निर्णयानुसार अपेक्षित आहे.











