धाराशिव – समय सारथी
धाराशिव जिल्हा परिषदेत काही विभाग प्रमुख हे बदलीच्या तयारीत असुन त्यांनी वेगवेगळी कारणे देत बदलीसाठी अर्ज केले आहेत. अवघ्या 5 महिन्यापुर्वी आलेले बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता यांनी लातूरला बदली करून घेतल्याने हा विषय चर्चेत आला आहे. 3 ते 4 विभाग प्रमुख हे बदलीच्या मार्गावर असुन त्यांनी कौटुंबिक, आरोग्य अशी वेगवेगळी कारणे देऊन विनंती बदलीसाठी अर्ज केल्याची माहिती आहे.
जिल्हा परिषदेत प्रशासक राज होते त्यानंतर निवडणुका होऊन सदस्य मंडळ आले आहे. प्रशासक काळात मनमोकळा कारभार करता येत होता आता मात्र सदस्य असल्याने बंधन व नियंत्रण आले, काहींना त्याची अडचण वाटत आहे. त्यातच राजकीय समीकरणे बदलल्याने आगामी काळात राजकीय संघर्ष, वाद पेटल्यावर आपण भरडले जाऊ नये अशीही भिती काहींनी खासगीत व्यक्त केली.
मनमोकळा कारभार, कोणाचा विरोध नाही, नागरिक शांत, संयमी व सहनशील त्यामुळे एकेकाळी धाराशिवला हवीहवीशी वाटणारी पोस्टिंग आता काहींना नकोशी झाली आहे. कामाचा जाच सोसवेना, त्यातच कनिष्ठ, सहकारी व सर्वासमोर होत असलेला शाब्दिक ‘उद्धार’ यामुळे काही जण वैतागले आहेत, बोलण्यापेक्षा आपला मार्ग निवडलेला बरा असे म्हणत इच्छित स्थळी बदलीसाठी काहींनी फिल्डिंग लावली आहे.











