धाराशिव – समय सारथी
मावस भावाचा धारदार कोयत्याने निर्घृण खून केल्याप्रकरणी आरोपी रामेश्वर संभाजी खोचरे याला प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश श्रीमती अभिश्री देव यांनी दोषी ठरवत जन्मठेपेची शिक्षा तसेच 25 हजार रुपये दंड ठोठावला. दंड न भरल्यास सहा महिन्यांची साधी कैद भोगावी लागणार आहे. जिल्हा सरकारी वकील ऍड महेंद्र देशमुख यांनी सादर केलेला पुरावा व युक्तिवाद ग्राह्य धरून कोर्टाने हा निर्णय सुनावला. अनैतिक संबंधातून या दोघात वाद निर्माण झाला होता.
तुळजापूर येथील ज्ञानेश्वर नाना करंडे यांना आरोपी रामेश्वर खोचरे याचे नात्यातील एका मुलीसोबत अनैतिक संबंध असल्याची माहिती होती. याबाबत त्यांनी आरोपीला समज देत संबंध तोडण्यास सांगितले होते. तसेच या प्रकरणाची माहिती इतर नातेवाईकांनाही झाल्याने आरोपीच्या मनात ज्ञानेश्वर यांच्याविषयी राग निर्माण झाला.
9 जून 2022 रोजी आरोपीने तुळजापूर येथील ज्ञानेश्वर यांच्या झेरॉक्स दुकानाजवळ त्यांच्यावर पाळत ठेवली. सायंकाळी ते स्कुटीवरून निघाल्यानंतर आरोपीने मोटारसायकलवरून त्यांचा पाठलाग करत तुळजापूर-सोलापूर महामार्गावरील काका का धाब्याजवळ अडवून धारदार कोयत्याने सपासप वार करून त्यांचा खून केला.
घटनास्थळी रक्ताच्या थारोळ्यात ज्ञानेश्वर यांचा मृतदेह आढळून आला. त्यांच्या पोटात कोयता अडकलेल्या अवस्थेत होता, घटनास्थळी आरोपीची मोटारसायकलही सापडली होती.
तुळजापूर पोलीस ठाण्यात खुनासह विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. तपासा दरम्यान सीसीटीव्ही फुटेज, घटनास्थळावरील वैज्ञानिक पुरावे आणि प्रत्यक्षदर्शी साक्षीदारांचे जबाब न्यायालयात सादर करण्यात आले. सरकारी पक्षातर्फे जिल्हा सरकारी अभियोक्ता महेंद्र बी. देशमुख यांनी नऊ साक्षीदार तपासले. अभियोजन पक्षाचा युक्तिवाद आणि सादर करण्यात आलेले पुरावे ग्राह्य धरत न्यायालयाने आरोपीला दोषी ठरवून जन्मठेपेची शिक्षा सुनावली.
या गुन्ह्याचा तपास पोलीस निरीक्षक अजिनाथ काशिद यांनी केला असून न्यायालयीन कामकाजासाठी पोलीस हेड कॉन्स्टेबल एम टी पाटोळे यांनी पैरवी केली.












