धाराशिव – समय सारथी
धाराशिव शहरातील कचऱ्याचे ढीग, अस्वच्छता, तुंबलेल्या गटारी यासह खराब रस्त्यामुळे नागरिकांसोबत सत्ताधारी पक्षाचे नगरसेवक सुद्धा हैराण व हतबल झाले आहेत. धाराशिव नगर परिषदेचे नगरसेवक अभिजीत पतंगे यांनी नगर परिषदेच्या मुख्याधिकारी यांना 2 लेखी निवेदने दिली असुन त्यात खराब रस्त्याची व अस्वछतेची वस्तुस्तिथी मांडत समस्या सोडविण्याचे आणि स्वच्छता ठेकेदार, कर्मचारी यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
सत्ताधारी भाजप पक्षाच्या नगरसेवकांनी ही मागणी केल्याने आता तरी प्रशासन व पालिकेचे ‘कारभारी’ जागे होऊन काम करणार का हे पाहावे लागेल. नगर परिषदेत सध्या एकहाती सत्ता असुन पतंगे यांनी ‘घरचा आहेर’ दिला आहे. नागरी समस्याकडे लक्ष वेधून डोळ्यात अंजन घालत नागरिकांच्या समस्यांना एकप्रकारे वाचा फोडली आहे. पावसाळापुर्वी करावयाची अनेक कामे रखडली असुन कागदोपत्री दिखावा केला जात आहे.
शरद पवार हायस्कूल ते बोंबले हनुमान चौक हा रस्ता अत्यंत खराब अवस्थेत असून ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे पडले आहेत. वाहनचालक, पादचारी, शालेय विद्यार्थी, महिला व ज्येष्ठ नागरिक यांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत असून अपघात होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.सदर रस्त्याचे काम तात्काळ सुरू करण्यात यावे, पावसाळी दिवस असल्याने सदरचे काम सुरू होईपर्यंत रस्त्यावरील सर्व खड्डे त्वरित बुजविण्यात यावेत, जेणेकरून नागरिकांची गैरसोय व अपघाताचा धोका टळेल अशी मागणी पहिल्या निवेदनात केली आहे.
प्रभाग क्रमांक 6 मध्ये केवळ 1 घंटागाडी व 2 सफाई कर्मचारी कार्यरत असल्यामुळे संपूर्ण प्रभागातील नियमित साफसफाई होत नाही. परिणामी अनेक ठिकाणी कचऱ्याचे ढीग साचले असून घाणीचे साम्राज्य निर्माण झाले आहे. गटारी तुंबलेल्या असल्याने नागरिकांना मोठ्या प्रमाणात गैरसोयीचा सामना करावा लागत असून दुर्गंधी व साथीच्या रोगांचा धोका निर्माण झाला आहे. आवश्यक यंत्रणा देऊन कर्तव्यात कसूर करणाऱ्या संबंधित ठेकेदार व जबाबदार कर्मचाऱ्यांवर योग्य ती प्रशासकीय कारवाई करावी अशी विनंती पतंगे यांनी दुसऱ्या निवेदनात केली आहे.
बहुतांश नगरसेवकांची नागरी समस्याबाबत अशीच व्यथा आहे मात्र पतंगे यांनी धारिष्ठ दाखवले, हे विशेष. लाडक्या ठेकेदाराने अनेक कामे अपूर्ण, गुणवत्ताहीन व नागमोडी करीत स्थापत्य कलेचा नमुना धाराशिवकरांना दाखविला आहे. अश्या अपूर्ण कामामुळे ऐन पावसाळ्याच्या तोंडावर अडचण झाली आहे. नागरिकांना उत्तर देताना नाकीनऊ येत आहे तर दुसरीकडे नेतृत्वाची मर्जी राखण्यासाठी सगळे अलबेल असल्याचे चित्र रंगवताना व ‘उदोउदो’ करताना तारेवरची कसरत करावी लागत आहे. लाडक्या ठेकेदारावर खास मर्जी असल्याने तोंड दाबून बुक्यांचा मार सहन करावा लागत आहे.
धाराशिव नगर परिषदेत पक्षाचा नगराध्यक्ष, स्वच्छता सभापती असतानाही रस्ते, स्वच्छता व गटारीचा प्रश्न मुख्याधिकारी ह्या प्रशासकीय पद्धतीने अधिक प्रभावीपणे व लवकर सोडवू शकतील असा विश्वास नगरसेवक पतंगे यांना असल्याचे निवेदनातून जाणवते. धाराशिवकर नागरिकांची सहनशीलता पराकोटीची आहे त्यातच एखादे जनहिताचे निवेदन दिले तर त्याला केराची टोपली दाखवली जाते मात्र आता सत्ताधारी नगरसेवकांनी मांडलेले प्रश्न सोडवले जातील का ? हे पाहावे लागेल.
धाराशिव शहरासह जिल्ह्यात विकासाचे दिवा स्वप्न बॅनर, रिल्स व पीपीटीद्वारे दाखविण्यापेक्षा मुलभुत व पायाभुत सुविधाकडे लक्ष देत आत्मचिंतनाची व जनतेचे प्रश्न जाणून घेण्याची गरज आहे. सोशल मीडियाच्या आभासी विश्वात AI माध्यमातून विकास अनधिकृत बॅनर व होर्डिंगवर दिसत असला तरी प्रत्यक्षात धाराशिव शहराची स्थिती बिकट आहे, पावसाळ्यात दरवर्षी निसर्ग विकासाची पोलखोल करतो तरी उपाययोजना शुन्य आहेत. रिल्स, फोटो सेशन, मोठ्या शहरातील पाहणी दौऱ्याच्या पलीकडे प्रत्यक्ष जमिनीवर विकास करावा लागतो याचा विसर गाव पुढाऱ्यांना पडला असुन याचा फटका नामदारकीचे ध्येय ठेवणाऱ्या युवा नेतृत्वाच्या प्रतिमेला व महत्वकांक्षेला बसू शकतो.











