धाराशिव – समय सारथी
धाराशिव जिल्हा कला केंद्र मुक्त झाला असला तरी नवीन कला केंद्र यांना परवाना मिळावा व ज्यांचे परवाने रद्द केले आहेत त्यांना मंजुरी मिळाली यासाठी कला केंद्र चालक व मालक यांची ‘लॉबी’ सक्रीय झाली असुन काही गावपुढाऱ्यांच्या मध्यस्थीने नेतृत्वाला साकडे घातले जात आहे. नुकतेच एक शिष्टमंडळ विशेष मुंबई दौऱ्यावर गेले, पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर झाला आहे, तो तात्काळ सोडवण्यासाठी मुंबईला रवाना होत असल्याचे गावकऱ्यांना भासविले मात्र तिथे गेल्यावर कला केंद्राचा मुद्दा प्रकर्षाने मांडण्यात आला.
जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीवेळी कला केंद्र बाबत काही आश्वासने दिली होती, त्या आश्वासनाची आठवण करून देत साकडे घालण्यात आले. नेतृत्वाने देखील संयमाने व गांभीर्याने म्हणणे ऐकून घेतले व शिष्यमंडळाला मंत्रालयातील विविध दालनात नेत फोटोसेशन करवीत माघारी पाठवले. राजकीय नेत्यांबरोबरच काहींनी कोर्टाचा सुद्धा मार्ग अवलंबला आहे मात्र तिथे ही पदरी निराशाच येत आहे. काही जण सुरु करण्यासाठी ‘प्यासे’ झाले आहेत. नेत्यांच्या माध्यमातुन प्रशासनावर दबाव आणण्याची ‘रणनिती’ आहे.
राज्याचे परिवहन मंत्री तथा पालकमंत्री प्रतापराव सरनाईक यांच्या आदेशानंतर जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार, पोलिस अधीक्षक रितू खोखर, अपर जिल्हा दंडाधिकारी विद्याचरण कडवकर यासह अन्य महसूल व पोलिस अधिकाऱ्यांनी पुढाकार घेत कला केंद्र यांची तपासणी करून सुनावणी अंती कला केंद्राचे परवाने रद्द केले तर काहीचे नूतनीकरण न करता ते रद्द केले. खासदार ओमराजे निंबाळकर, आमदार कैलास पाटील यासह अन्य काहींनी कला केंद्रचा मुद्दा सामाजिक असल्याने त्याला साथ दिली.
गोरगरिबांचे संसार उघड्यावर येत असल्याने अनेक नेत्यांनी या विषयाला थारा दिला नाही. धाराशिव जिल्हा कला केंद्र मुक्त झाल्यावर शेजारी सोलापूर व बीड जिल्ह्यात सुद्धा कारवाई झाल्या. बीड पोलिस अधीक्षक नवनीत कॉवत व सोलापूर ग्रामीण पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी धडक कारवाया करीत काही कला केंद्राना सील केले. कला केंद्राचा त्रास हा स्थानिक नागरिक, महिला यांना मोठ्या प्रमाणात होत होता, अनेक कुटुंब आर्थिक संकटात आले होते. गुन्हेगारी, हाणामारीचे प्रमाण कमी झाले होते, आता कुठे स्तिथी सुधारत असतानाच नेतृत्वाने ते सुरु करण्याचा घाट रचित खाटाटोपीचा उद्योग सुरु केला आहे.
कला केंद्र व्यवसायात काही ठराविक मंडळी आहेत जे वेगवेगळे प्रस्ताव सादर करतात, धाराशिव जिल्ह्यात 6 कला केंद्र परवाने रद्द केले असले तरी नवीन 6 प्रस्ताव सादर केले आहेत. देवी देवातांची नावे देऊन कलेच्या नावाखाली अनेक चुकीचे प्रकार, हाणामारी, हत्या, काही ठिकाणी लैंगिक शोषण, वेश्या व्यवसाय झाल्याचे पोलिस कारवाईत समोर आले आहे. तुळजाई, पिंजरा, कालिका, महाकाली, गौरी व साई ही 6 कला केंद्राचे परवाने रद्द केले आहेत.
बाबासाहेब घाटे यांचा ‘पिंजरा’ तर अक्षय साळुंके यांच्या ‘महाकाली’ कला केंद्राचा परवाना कायमस्वरूपी रद्द केला आहे. घाटे व साळुंके यांनी ‘नटरंग’ तर अरविंद गायकवाड यांनी तुळजापूर तालुक्यातील धनगरवाडी येथील ‘चंद्राई’ कला केंद्र, कळंब तालुक्यातील वडगाव ज येथे ‘अंबिका’ कला केंद्रासाठी येडशी येथील नानासाहेब पवार यांनी, वडगाव ज येथे ‘रेणुका’ कला केंद्रासाठी येडशी येथील सतीश वामन जाधव यांनी, आळणी येथे ‘प्यासा’ केंद्र सुरु करण्यासाठी श्रीपाल वीर व भाटशीरपुरा येथील शितल गायकवाड यांनी प्रस्ताव सादर केले आहेत मात्र अनेक प्रस्तावात त्रुटी असल्याने एकही नवीन परवाना प्रशासनाने दिलेला नाही. टोलेजंग इमारती बांधून तिथे हा उद्योग सुरु करण्याचा घाट आहे, काही जणांची यात छुपी गुंतवणूक आहे.











