धाराशिव – समय सारथी
बीड येथील कथित भुसंपादन घोटाळा प्रकरणी तत्कालीन जिल्हाधिकारी अविनाश पाठक यांच्या जामीन अर्जावर छत्रपती संभाजीनगर उच्च न्यायालयात सुनावणी पार पडली. लवादाचे मावेजा आदेश हे आपलेच असल्याचे व ते सर्व आदेश नियमांमध्येच आणि कायद्याने असलेल्या अधिकारातच पारित करण्यात आल्याचा युक्तिवाद पाठक यांच्या वतीने करण्यात आला. ज्येष्ठ विधीज्ञ आड राजेंद्र देशमुख यांनी कोर्टात सक्षमपणे बाजु मांडली. या प्रकरणातील पुढील सुनावणी 9 जुलै रोजी न्यायाधीश अभय वाघवसे यांच्या कोर्टात होणार आहे.
भुसंपादन मावेजाचे सर्व आदेश आपण त्या पदावर असतानाच पारित केले. या प्रकरणात रोजनामा लिहण्याचे काम जिल्हाधिकाऱ्यांचे नाही, ते संबंधित शाखेच्या कारकुनांकडून ठेवले जातात, त्यामुळे रोजनामे आहेत का नाही याबद्दल आपण भाष्य करू शकत नाही. मात्र सर्व आदेश नियमाप्रमाणे काढण्यात आलेले आहेत असा दावा यावेळी देशमुख यांनी केला. तसेच एका सनदी अधिकाऱ्याला पहाटे उठवून अटक करण्यासारखी काय घाई पोलिसांना झाली होती असा सवाल देखील उपस्थित करण्यात आला. आता या प्रकरणात सरकार पक्षाच्या वतीने सरकारी वकील अमरजितसिंह गिरासे हे 9 जुलै रोजी युक्तिवाद करणार आहेत.
बीड येथील भुसंपादन घोटाळा प्रकरणी पाठक हे सध्या न्यायालयीन कोठडीत बीड येथील जिल्हा कारागृहात आहेत. तपासात त्यांनी त्यांच्या सह्या व आदेश स्वतः केल्याचे मान्य केले असुन त्यांना जामीन मिळतो का हे उच्च न्यायालयात स्पष्ट होणार आहे. ऍड राजेंद्र देशमुख, ऍड देवांग देशमुख हे बाजु मांडत असुन पाठक यांना विनाकारण गोवल्याचा व प्रकरणात काहीही चुकीचे नसल्याचे म्हणणे आहे.












