धाराशिव – समय सारथी
निवडणूक अनुषंगीक कामकाजात टाळाटाळ केल्यामुळे मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (BLO) तथा शम्स उलूम उर्दु हायस्कूलचे सहशिक्षक सय्यद जुनेद कादरी यांचे विरुध्द लोकप्रतिनिधीत्व अधिनियम 1950 मधील कलम 32 च्या तरतुदीनुसार गुन्हा दाखल करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार, मतदार नोंदणी अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी गणेश शिंदे यांच्या आदेशावरून तहसीलदार डॉ मृणाल जाधव यांनी हे आदेश दिले असुन यासाठी मतदान केंद्र स्तरीय पर्यवेक्षक सतीश सोमाणी यांना प्राधिकृत केले आहे.
कादरी यांनी धाराशिव शहरातील काँग्रेस पक्षाच्या नगरसेवक उजमा सबा अझहर पठाण यांच्या कार्यालयात बसून मतदार नोंदणी करतानाचा व्हिडिओ निजाम नदाफ यांनी शेअर केला होता तर भाजपचे धाराशिव – कळंब विधानसभा मतदार संघांचे प्रमुख ऍड दत्तात्रय देवळकर व जिल्हा सरचिटणीस ऍड नितीन भोसले यांनी जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांच्याकडे लेखी तक्रार केली होती.
कारणे दाखवा नोटीस बजावत समक्ष लेखी खुलासा करण्याचे आदेश दिले होते, खुलासा अमान्य करीत गुन्हा नोंद करण्याचे आदेश दिले आहेत. दैनिक समय सारथी वृत्तपत्र या प्रकाराचा पाठपुरावा करीत असुन आणखी 6 जण कारवाईच्या रडारवर आहेत.
सय्यद यांनी भाग यादीमधील 964 मतदारांपैकी केवळ 520 मतदारांना फॉर्म वितरण केल्याचे दिसुन आले. अद्यापी तब्बल 444 मतदारांना फॉर्म वाटप केले नाही. 15 दिवसांनंतरही फॉर्म वितरणच्या कामाची टक्केवारी ही केवळ 53.94% इतकीच आहे. केवळ 64 मतदारांचेच फॉर्म डिजीटालायझेशेन केलेले दिसून येते. त्यामुळे तालुक्याचे कामकाजावर विपरीत परिणाम झाल्याचा ठपका ठेवला आहे.
कादरी यांनी राजकीय पक्षाचे कार्यालयात बसून SIR मोहिमेचे कामकाज केल्याने गंभीर स्वरूपाचा कसूर केल्याचे सकृतदर्शनी स्पष्ट होत असल्याचे कळवून निवडणूक आयोगाच्या तटस्थता आणि पारदर्शकता या मूळ तत्त्वांचे आणि वरिष्ठ कार्यालयाने दिलेल्या आदेशाचे जाणीवपूर्वक उल्लंघन केले असल्याचा ठपका ठेवला. राष्ट्रीय निवडणूक कामातील कर्तव्यात गंभीर कसुरी व बेजबाबदार वर्तन केल्याप्रकरणी गुन्हा नोंद करण्याचे आदेश दिले आहेत.
बीएलओ सुनील सुखदेव मोहीते, बाबासाहेब महादेव बनकर, दीपक नेहालसिंग जारवाल, निवृत्ती चंदर देशमुख, बालाजी बापुसाहेब शिंदे व मनेष आत्माराम नवले अश्या 6 जणांना कारणे दाखवा नोटीसा बजावण्यात आल्या असुन या सर्वांनी राजकीय पक्षाच्या पदाधिकारी यांच्या पाठिंब्याने कॅम्प लावुन नोंदणी केल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. त्यांच्या बाबतीत काय निर्णय होतो याकडे लक्ष लागले आहे.











