धाराशिव – समय सारथी
सायबर गुन्ह्यांमधून मिळालेली फसवणुकीची रक्कम स्वतःच्या बँक खात्यांमधून फिरवून देशभरातील नागरिकांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी सायबर पोलीस ठाण्यात 2 स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या दोन्ही प्रकरणांमध्ये संबंधित खातेदारांनी संघटित सायबर गुन्हेगारी टोळीला आर्थिक व्यवहारासाठी आपली बँक खाती उपलब्ध करून दिल्याचा आरोप आहे.
पहिल्या प्रकरणात, आयडीबीआय बँकेच्या खाते क्रमांक 1458102000008990 च्या खातेदाराने 17 डिसेंबर 2025 ते 23 मार्च 2026 या कालावधीत सायबर गुन्ह्यातील फसवणुकीची रक्कम आपल्या खात्यामार्फत वर्ग करून त्यावर ऑनलाइन व्यवहार केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. या व्यवहारांमुळे देशभरातील 15 नागरिकांची तब्बल 10 कोटी 65 लाख 60 हजार 114 रुपयांची फसवणूक झाल्याचे समोर आले आहे.
दुसऱ्या प्रकरणात, स्टेट बँक ऑफ इंडियाच्या खाते क्रमांक 0000003883809473 च्या खातेदाराने 22 एप्रिल 2026 ते 25 जून 2026 या कालावधीत सायबर गुन्हेगारी टोळीला आर्थिक व्यवहारासाठी आपले खाते उपलब्ध करून दिल्याचा आरोप आहे. या खात्यातून झालेल्या व्यवहारांमुळे देशभरातील तीन नागरिकांची 36 लाख 92 हजार 831 रुपयांची ऑनलाइन फसवणूक झाल्याचे तपासात समोर आले आहे.
दोन्ही प्रकरणीही ज्ञानेश्वर विलास सूर्यवंशी यांच्या फिर्यादीवरून भारतीय न्याय संहितेच्या कलम 318(4), 320, 321, 335, 336, 340 तसेच माहिती तंत्रज्ञान अधिनियमाच्या कलम 66(C) व 66(D) अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
सायबर पोलीस दोन्ही प्रकरणांचा सखोल तपास करत असून, संबंधित खातेदारांसह सायबर गुन्हेगारी टोळीतील इतर आरोपींचा शोध सुरू आहे. या प्रकरणांमुळे सायबर फसवणुकीसाठी वापरल्या जाणाऱ्या ‘म्युल अकाउंट’च्या वाढत्या जाळ्यावर पुन्हा एकदा प्रकाश पडला आहे.











