बांधकाम विभागाचा प्रताप – सेस निधी, सुट्टीचा मुहूर्त, रातोरात यंत्रणा, शिवसेनेने काम बंद पाडले
धाराशिव – समय सारथी
धाराशिव पंचायत समितीचे मुख्य प्रवेशद्वार बंद करण्याचा घाट रचला जात असुन संरक्षण भिंतीच्या नावाखाली इथे एक भिंत बांधण्यात येत आहे. मुळात हे पंचायत समितीचे प्रवेशद्वार असतानाही राजहट्टामुळे मनमानी कारभार सुरु आहे. संरक्षण भिंत व गेटचे काम हे अडीच लाखांचे असुन कामाच्या कार्यारंभ आदेशावर दिनांक व जावक क्रमांक टाकलेला नाही त्यामुळे यात ‘गोलमाल’ असल्याची चर्चा रंगत आहे. ‘राजहट्ट’ पुर्ण करताना जावक व दिनांक न टाकल्याने ‘भांडाफोड’ झाला असुन बांधकाम विभागाचा कारभार चव्हाट्यावर आला आहे. दरम्यान हे कांड सुरु असल्याची माहिती मिळताच शिवसेना उबाठा गटाच्या नेत्यांनी येऊन काम बंद पाडले.

धाराशिव पंचायत समितीमधुन समता नगर भागाकडे जाणारा रस्ता हा राजकीय दृष्ट्या वादग्रस्त बनला आहे. तो रस्ता बंद करण्यासाठी जिल्हा परिषद अध्यक्षा अर्चना ताई पाटील ह्या जीवाचे रान करीत असुन सर्व शासकीय यंत्रणा व पर्याय वापरीत आहेत. कधी तारेचे कुंपण तर कधी बंद पडलेल्या भंगार गाड्या या रस्त्यावर लावुन रस्ता बंद केला गेला मात्र शिवसैनिक गनिमी कावा करीत तो प्रत्येक वेळी खुला केला. अर्चना ताई ह्या या विषयात जिद्दीला पेटल्या असुन त्यांनी रस्ता बंद करण्याचा राजहट्ट केला आहे. शेवटचा पर्याय म्हणुन संरक्षण भिंत म्हणुन काम दिले आहे.
स्वप्नील नवनाथ नाईकवाडी या ठेकेदाराला हे काम देण्याचे कार्यारंभ आदेश देण्यात आले आहेत. शाखा अभियंता (बां) यांनी उप अभियंता (बां) यांचे कडुन कामाची मोजमापे व तपासणी ही केवळ काम पुर्ण झाल्यानंतर न घेता वेळोवेळी चालु कामामध्ये करून घ्यावी अशी अट कार्यारंभ आदेशात नमुद आहे मात्र 100 दिवसांचा कामाचा कालावधी असताना देखील रात्रीतून तत्परता दाखवीत हे काम सुरु होते.
प्रवेशद्वार व रस्ता बंद करीत असल्याची माहिती मिळताच शिवसेना उबाठा गटाचे युवा सेना जिल्हाप्रमुख रवी वाघमारे, माजी नगरसेवक राणा बनसोडे, अभिजीत कदम यांनी कामाच्या ठिकाणी जाऊन जाब विचारला, त्यावर त्यांना कार्यारंभ आदेश दाखवण्यात आला. त्या आदेशावर तारीख व जावक क्रमांक नव्हता. शिवसैनिकांनी आक्रमक होत हे काम बंद पाडले. आगामी काळात असे प्रकार खपवून घेणार नाही असा इशारा शिवसैनिकांनी दिला.











