धाराशिव – समय सारथी
खासदार ओमराजे निंबाळकर यांनी शिवसेना उबाठा गटाला ‘जय महाराष्ट्र’ करीत शिवसेना शिंदे गटात प्रवेश केल्याच्या घटनेला दीड महिना उलटला आहे. ओमराजे हे शिवसेना पक्षात आल्यानंतर संसदेचे अधिवेशन सुरु झाले, 15 ऑगस्ट नंतर धाराशिव जिल्ह्याच्या राजकारणात मोठ्या घडामोडी घडणार असुन घरवापसीसह नवीन संघटनात्मक निवडी करण्यात येणार आहेत.
ओमराजे यांच्या पक्ष प्रवेशानंतर धाराशिव शिवसेनेची जिल्हा कार्यकारिणी बरखास्त करण्यात आली होती त्यानंतर संघटनात्मक निवडी झालेल्या नसुन अनेक इच्छुकांनी फिल्डिंग लावली आहे. या निवडीमध्ये जुने शिवसेना पदाधिकारी व ओमराजे यांच्यासोबत आलेले पदाधिकारी यांचा समन्वय राखणे तारेवरची कसरत ठरणार असली तरी निवडीत ओमराजें ‘ग्रीन सिग्नल’ व ‘वरचष्मा’ असणार आहे. राणाजगजीतसिंह पाटील समर्थक असा आरोप असलेल्या नेत्यांची संघटनात्मक पदावर ‘घुसखोरी’ थांबविणे हे एक आव्हान असणार आहे.
सत्तेत विकासाच्या मुद्यावर काही पदाधिकारी यांनी ओमराजे पर्यायाने शिवसेना उबाठा गटाची साथ सोडून भाजपात प्रवेश केला होता, तेथील नेतृत्वाच्या कार्यपद्धतीला कंटाळलेले काही मुख्य पदाधिकारी पुन्हा ओमराजे यांच्यासोबत येणार आहेत. विकासाच्या नावेत हे पदाधिकारी, गावपुढारी सहभागी होणार आहेत. ओमराजे हे महायुतीत आल्याने भाजपच्या काही पदाधिकारी यांना बळ व आधार मिळाला आहे, त्यामुळे सकारात्मक वातावरण निर्माण झाले आहे.
ओमराजे यांचे किती समर्थक नगरसेवक, जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्य अधिकृतरित्या शिवसेना पक्षात प्रवेश करणार का हेही पाहावे लागेल. धाराशिव नगर परिषदेत शिवसेना शिंदे गटाचा एकही नगरसेवक नाही, उबाठा गटाचे 7 नगरसेवक असुन त्यांचा ‘वावर’ सोई व कामानुसार दोन्ही शिवसेनेत आहे. सत्तेचा लाभ व विकास कामात वाटा हवा असेल तर गट तयार करून महायुतीत या अशी अट भाजपच्या नेतृत्वाने टाकल्याची माहिती आहे.
भाजपचे कारभारी राणाजगजीतसिंह पाटील व पालकमंत्री प्रतापराव सरनाईक यांचे मधुर संबंध जिल्हा परिषद व नगर परिषद निवडणुकीत स्थापित झाले आहेत. एक निविदा, लाडका ठेकेदार व ऍडव्हान्स टोकन पद्धतीचा ‘सवय’ जडल्याने काही बाबीत अडथळा आणला जात आहे. ओमराजेंची कोंडी करण्यासाठी ‘वाटा हवा असेल तर गट सोबत आना’ अशी आयडियाची कल्पना पद्धतशीरपणे भाजपला पुरवली आहे. अंमलबजावणी यंत्रणा म्हणुन नगर परिषद ऐवजी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे निधी देत ओमराजेनी पलटवार केला आहे.
शिवसेना शिंदे पक्षाचा एक गट रसदच्या बदल्यात भाजपला अंतर्गत मदत करीत असल्याचे आव्हान ओमराजे समोर आहे. एकंदरीत आगामी काळात ओमराजे यांना विकास कामासोबत पक्ष संघटनात्मक बांधणीवर भर द्यावा लागणार आहे.











