धाराशिव – समय सारथी
शिवसेनेचे उबाठा गटाचे काही खासदार फुटून शिवसेना शिंदे गटात जाणार असल्याच्या हालचालीना वेग आला असतानाच धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर यांची भुमिका अद्याप गुलदस्त्यात आहे. कै पवनराजे निंबाळकर यांच्या हत्येचा निकाल 20 जुन रोजी लागणार असुन त्या निकालानंतर बऱ्याच राजकीय घडामोडी घडणार आहेत, खासदार ओमराजे निंबाळकर हे कदाचित निकालानंतर भुमिका स्पष्ट व जाहीर करू शकतात अशी सुत्रांची माहिती आहे.
नात्याने चुलत भाऊ माजी गृहमंत्री डॉ पद्मसिंह पाटील यांच्यासह 9 जन कै पवनराजे निंबाळकर व त्यांचा ड्राईव्हर समद काझी यांच्या दुहेरी हत्याकांडात आरोपी असुन ते जामीनावर आहेत. या हत्याकांड नंतर जिल्ह्यातील राजकीय चित्र बदलले होते, डॉ पाटील परिवाराने राष्ट्रवादी सोडून भाजप प्रवेश घेतला. निकालानंतर अनेक राजकीय घडामोडी, आरोप प्रत्यारोप होऊ शकतात.
डॉ पाटील यांचे पुत्र राणाजगजीतसिंह पाटील हे तुळजापूर विधानसभा मतदार संघातून आमदार आहेत. पवनराजे हत्याकांड व तेरणा ट्रस्ट ही पक्ष प्रवेशाची कारणे असल्याचा आरोपी अनेकवेळा झाला आहे, त्यामुळे आता निकाल काय लागतो ? याकडे राज्याचे लक्ष लागले आहे. रक्ताच्या नात्याला काळिमा फसली असुन 20 वर्षे 13 दिवस संघर्ष करून वाट पाहिली. मानसिकते विरुद्ध संघर्ष असुन अपेक्षा न्यायाची आहे अशी पोस्ट ओम राजे यांनी 16 जुनला केली होती.
5 खासदार हे दिल्लीत गेले असल्याची माहिती असुन ओमराजे निंबाळकर हे गेले नाहीत हे स्पष्ट झाले आहे. दरम्यान ठाकरे गटाने शिवसेना खासदार यांची बैठक बोलावली असुन अरविंद सावंत यांनी तसा व्हीप काढला आहे. बैठकीला न येणाऱ्या खासदार यांच्यावर कारवाई केली जाणार आहे. 5 खासदार हे शिवसेना वर्धापन दिनी शिंदे गटात प्रवेश करणार असल्याची सुत्रांची माहिती आहे.
शिवसेना शिंदे गटाचे नेते तथा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व खासदार श्रीकांत शिंदे हे लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांची भेट घेणार आहेत. दरम्यान स्वतंत्र गटाला परवानगी देऊ नये असे पत्र शिवसेना ठाकरे गटाने लोकसभा अध्यक्षाना दिले आहे.












