धाराशिव – समय सारथी
कृष्णा मराठवाडा पाणी प्रश्न आता चांगलाच पेटला असुन आमने सामने चर्चेचे आव्हान माजी विरोधीपक्ष नेते अंबादास दानवे यांनी स्वीकारले असुन आमदार राणाजगजीतसिंह पाटील यांनी तारीख वेळ व ठिकाण सांगावी मी चर्चेला येतो. पाणी आले नसताना त्यांनी लोकांना फसविले आहे, या योजनेच्या सुरुवाती पासुन आजवरच्या चर्चेची माझी तयारी असुन मी माझ्या वक्तव्यावर ठाम आहे असे ते म्हणाले. यानंतर आमदार पाटील यांच्या भुमिकेकडे लक्ष लागले आहे.
आमदार राणाजगजीतसिंह पाटील यांनी उजनीचे पाणी तुळजापूरला आले आहे असे सांगून लोकांना फसविले असल्याचा आरोप माजी विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांनी केला. अजून काम व्हायला 2-3 वर्ष बाकी आहेत मग कसे आले 7 टीएमसी पाणी असा सवाल केला. तुळजापूरची सगळी जनता सांगेल उजनीचे पाणी आले का ? मी वास्तव सत्य बोललो. ते किती फसवणूक करतात असे म्हणाले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे काय आमदार राणाजगजीतसिंह पाटील यांना बोलायला आले होते काय ? ते मुख्यमंत्री यांना सोडतच नव्हते, शेतकऱ्यांना धक्काबुक्की करीत होते. तू मोठा नेता आहेस ना मग मुख्यमंत्री यांना मुंबईला जाऊन बोल ना. इथे शेतकऱ्यांना त्यांच्याशी बोलू द्यायला पाहिजे होते असे दानवे म्हणाले.
यापूर्वी दानवे यांनी छत्रपती संभाजीनगर सभेत आमदार राणाजगजीतसिंह पाटील यांच्यावर ‘दिवट्या आमदार’ या भाषेत बाप काढुन भर सभेत टीका केली. रामदरा बंधाऱ्यात पाणी टाकून उजनीचे पाणी आले असे भासाविले गेले, त्यांच्या बापाने असे पाणी आणले होते का ? अशी टीका केली होती.
दानवे सारखी तत्सम लोकांना जास्त महत्व देण्याची गरज नसून त्यांचे सरकार असताना त्यांनी उजनीच्या पाण्याला निधी दिला नाही, रेल्वेसाठी निधी दिला नाही, तुळजापूरचा प्रस्ताव केंद्रात पाठवला नाही. ते ज्यावेळी धाराशिवला येतील त्यावेळी समोसमोर बोलवा मग चर्चा करू असे आव्हान राणा पाटील यांनी अंबादास दानवे यांना दिले होते, ते दानवेनी स्वीकारले आहे.
भारतीय जनता पार्टीचा दिवट्या आमदार बंधाऱ्यातील पाणी रामदरा तलावात सोडतो आणि पश्चिम महाराष्ट्रतील हक्काचे उजनीचे पाणी आणलं म्हणतो त्याच्या बापाने असे पाणी आणले होते का असा प्रश्न विचारत जहरी टीका केली होती. टीका करताना दानवे याचा तोल घसरला असुन त्यांनी बाप काढत डॉ पद्मसिंह पाटील यांच्यावर टीका केली.
आमदार पाटील व डॉ पाटील यांच्यावरील टिकेनंतर आमदार पाटील समर्थकांनी अंबादास दानवे यांच्यावर नासका आंबा अशी टीका करीत प्रतिउत्तर दिले. या आरोप प्रत्यारोपनंतर धाराशिव जिल्ह्यातील राजकारण चांगलेच तापले आहे. तुझी लायकी काय? मागच्या दाराने आलास, औकातीत रहा अशी तंबी दिली.











