तुळजाभवानी नवरात्र, प्रशासकीय व हॉस्पिटल आढावा – खासदार ओमराजेंच्या घरी भेट
धाराशिव – समय सारथी
राज्याचे परिवहन मंत्री तथा धाराशिव पालकमंत्री प्रतापराव सरनाईक हे शनिवारी 15 ऑगस्ट रोजी धाराशिव जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. मुख्य ध्वजारोहण कार्यक्रम, 45 मीटर उंचीचा स्वराज्य ध्वज, हरित धाराशिव अभियान 2.0 गिनीज बुक नोंद, तुळजाभवानी शारदीय नवरात्र उत्सव, प्रशासकीय विभागाची आढावा बैठक व तुळजापूर येथे मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल सद्यस्तिथी आढावा बैठक घेऊन ते खासदार ओमराजेंच्या घरी गोवर्धनवाडी येथे सदिच्छा भेट देणार आहेत. ऑपरेशन टायगर यशस्वी झाल्यानंतर पालकमंत्री सरनाईक यांचा हा पहिलाच दौरा असुन अनेक राजकीय, प्रशासकीय घडामोडी घडणार आहेत.
धाराशिव शहरात छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून नावीन्यपुर्ण अंतर्गत 90 लाख रुपयातुन भव्य असा स्वराज्य ध्वज उभा करण्यात आला आहे. नगर परिषदेच्या मार्फत पवन सर्व्हिसेस या एजेन्सीने हे काम केले असुन याचे लोकार्पण पालकमंत्री यांच्या हस्ते होणार आहे, या ध्वजामुळे धाराशिव शहराच्या वैभवात भर पडणार आहे.
पालकमंत्री सरनाईक सकाळी 8.45 वाजता शासकीय विश्रामगृह, धाराशिव येथून मोटारीने जिल्हाधिकारी कार्यालयाकडे रवाना होतील. सकाळी 8.55 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयात त्यांचे आगमन होईल. त्यानंतर सकाळी 9.05 वाजता भारताच्या स्वातंत्र्यदिनाच्या 80 व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित ‘ध्वजारोहणाचा मुख्य शासकीय समारंभा’स ते उपस्थित राहणार आहेत.
सकाळी 9.45 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयात धाराशिव जिल्ह्यातील प्रशासकीय विभागांचा आढावा बैठक होणार आहे. या बैठकीत आगामी शारदीय नवरात्र महोत्सव 2026 संदर्भातील तयारी तसेच श्री क्षेत्र तुळजापूर येथील मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटलच्या सद्यस्थितीचा आढावा घेतला जाणार आहे. सकाळी 11 वाजता 45 मीटर उंच स्वराज्य ध्वजाच्या उद्घाटन सोहळ्यास ते उपस्थित राहणार आहेत.
शिंगोली वनक्षेत्रात आयोजित ‘हरित धाराशिव अभियान 2.0’ या कार्यक्रमास 11. 45 वाजता पालकमंत्री उपस्थित राहणार आहेत. दुपारी 2 वाजता खासदार ओम राजेनिंबाळकर यांच्या निवासस्थानी पालकमंत्री सदिच्छा भेट देणार आहेत. त्यानंतर दुपारी 3 वाजता गोवर्धनवाडी येथून मोटारीने छत्रपती संभाजी महाराज विमानतळाकडे रवाना होतील.











