मयत, भुमीहीन शेतकऱ्यांना वाटप – 15 अधिकारी निलंबित, मुख्य सुत्रधाराला अभय, विभागीय चौकशी
धाराशिव – समय सारथी
धाराशिव जिल्ह्यातील एकात्मिक कीड व्यवस्थापन व एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन योजनेत घोटाळा करणाऱ्या अधिकारी यांच्यावर गुन्हे नोंद करण्याची मागणी जोर धरीत असुन गुन्हे नोंद करण्याची शिफारस सचिवाकडे करणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी किर्ती किरण पुजार यांनी दिली आहे. घोटाळ्यात काही जणांना अडकवले तर काही जणांना अभय दिले जात असुन चौकशी होऊन गुन्हे नोंद करावे अशी मागणी आमदार कैलास पाटील यांनी केली आहे. राज्य सरकार मात्र यावर चुप्पी साधुन असुन दोषींना पाठीशी घालत आहे.
कृषी निविष्ठा महाघोटाळ्यात 17 अधिकाऱ्यांना दोषी ठरविण्यात आले असुन त्यातील 14 कृषी अधिकाऱ्यांचे निलंबन करण्यात आले आहे. भुमीहीन, मयत, दुबार, बिगर सभासद यांच्या नावाने निविष्ठा वाटप झाले होते. घोटाळ्यातील 2 कोटी 32 लाख रुपयांच्या रक्कम वसुलीसह कारवाई होणे अपेक्षित आहे. लातुर जिल्हा कृषी अधिकारी राजेंद्र कदम यांनी 76 पानाचा अहवाल दिला. मुख्य सूत्रधार तत्कालीन प्रभारी जिल्हा कृषी अधीक्षक तथा उपविभागीय कषी अधिकारी महादेव किसन असलकर यांचे निलंबन न करता अभय देण्यात आले तर जिल्हा कृषी अधीक्षक राजकुमार मोरे यांना सन्मानाची सेवानिवृत्ती देण्यात आली.
भुम तालुका कृषी अधिकारी अतुल अशोक ढवळे यांना 22.45 लाख, परंडा तालुका कृषी अधिकारी नानासाहेब नारायण लांगडे 33.40 लाख, कळंब तालुका कृषी अधिकारी भागवत हनुमंत सरडे 33.40 लाख, धाराशिव व लोहारा तालुका कृषी अधिकारी महेश नामदेव देवकते 57.77 लाख, तुळजापूर तालुका कृषी अधिकारी आबासाहेब जितेंद्र देशमुख यांना 44 लाखांच्या अनियमिततेला जबाबदार धरत ठपका ठेवला आहे. उमरगा तालुका कृषी अधिकारी ज्ञानोबा बाबासाहेब रितापुरे 10.65 लाख असुन त्यांनी पौष्टिक तृणधान्य योजनेची माहितीच उपलब्ध करून दिली नाही.
आमदार कैलास पाटील यांनी खरीप आढावा बैठकीत व कृषी मंत्री यांच्याकडे तर सामाजिक कार्यकर्ते भास्कर वारे यांनी सुद्धा मुख्यमंत्र्यांना तक्रार देत मुंबई समुद्रात जलसमाधी आंदोलनाचा इशारा दिला होता तर शेतकरी आंदोलक अमोल जाधव यांनी धाराशिव व पुणे आयुक्त कार्यालयाच्या इमारतीवर चढून आंदोलन केले होते. दैनिक समय सारथी वृत्तपत्राने निविष्टासह वेतन, शेडनेट, सेवा वर्गसह अन्य घोटाळे व आयुक्त रफिक नाईकवाडींसह सन्मानाची सेवा निवृत्ती आणि “घोटाळा करा पैसे भरा व मुक्त व्हा” असा पॅटर्न सुरु असल्यासह अन्य बाबी मांडत कृषी मंत्री दत्ता भरणे यांच्या भूमिकेवर प्रश्न चिन्ह उपस्थितीत केले होते.
जिल्हा कृषी अधीक्षक राजकुमार मोरे, तत्कालीन प्रभारी जिल्हा कृषी अधीक्षक तथा उपविभागीय कषी अधिकारी महादेव किसन असलकर, जिल्हा सल्लागार सतीश सुरवसे, जिल्हा कृषी अधीक्षक कार्यालयातील सहायक कृषी अधिकारी राहूल गंगाधर सूर्यवंशी यांना चौकशीत जबाबदार धरण्यात आले असुन निलंबन केले आहे तर कंत्राटी कर्मचारी सुरवसे याची सेवा समाप्ती केली आहे.
वाशी तालुका कृषी अधिकारी राजाराम धनाजी बर्वे, भुम तालुका कृषी अधिकारी अतुल अशोक ढवळे,परंडा तालुका कृषी अधिकारी नानासाहेब नारायण लांगडे, कळंब तालुका कृषी अधिकारी भागवत हनुमंत सरडे, धाराशिव व लोहारा तालुका कृषी अधिकारी महेश नामदेव देवकते, उमरगा तालुका कृषी अधिकारी ज्ञानोबा बाबासाहेब रितापुरे, तुळजापूर तालुका कृषी अधिकारी आबासाहेब जितेंद्र देशमुख या 8 तालुक्याच्या 7 कृषी अधिकारीसह मंडळ कृषी अधिकारी अणदूर श्रीमती पल्लवी मच्छिन्द्र काटकर, काटीचे विठ्ठल गोविंद नागटिळक, नळदुर्गचे सत्यजीत गजेंद्र देशमुख व तुळजापूर मंडळ कृषी अधिकारी अमित अशोक भोसले या 4 मंडळ कृषी अधिकारी यांचा निलंबनात समावेश आहे.












