धाराशिव – समय सारथी
प्रशिक्षण दिले नसतानाही कागदोपत्री प्रशिक्षण दाखवून बोगस सह्या केल्याचा प्रकार धाराशिव एसटी महामंडळात घडला आहे. राज्य सरकारने NCMC कार्ड सुरु केले असुन त्याबाबत वाहकांना देण्यात आलेल्या प्रशिक्षण व इतर कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. प्रशिक्षण दिल्याचे कागदोपत्री दाखविले असल्याची अनेक वाहकांची तक्रार आहे.
1 ऑक्टोबर 2026 पासून महिला, ज्येष्ठ नागरिकासाठी अमृत ज्येष्ठ नागरिकांच्या सवलतीच्या प्रवासासाठी NCMC कार्ड वापरण्याची अट लागू करण्यात आली आहे. त्यासाठी वाहकांना कार्ड कसे वापरावे, तांत्रिक अडचणी आल्यास त्या कश्या सोडवव्यात याचे प्रशिक्षण बंधनकारक करण्यात आले आहे.

धाराशिव डेपोसाठी नवीन NCMC कार्ड प्रकल्पाशी संबंधित अप्लिकेशन आणि संबंधित अँड्रॉइड हँडहेल्ड उपकरणांच्या वापराबाबतचे प्रशिक्षण यशस्वीरित्या पूर्ण झाले असल्याचे धाराशिव आगार प्रमुखांनी संबंधित कंपनीला 26 सप्टेंबर रोजी लेखी पत्र देऊन कळविले आहे. या पत्रासोबत 183 वाहक (कंडक्टर) यांची नावे जोडली असुन त्यात 169 जणांच्या सह्या आहेत तर 14 जणांच्या नावापुढे सही नाही. 169 जणांनी प्रशिक्षण पुर्ण केल्याचे दाखविले आहे मात्र त्यातील बहुतांश जणांना प्रशिक्षण मिळाले नसुन सह्या ह्या बोगस असल्याची तक्रार आहे.

सुलेखा अभिमन्यु घाडगे वाहक क्रमांक 6326 ह्या गेली 1 वर्षभरापासून अपघात झाल्याने वैद्यकीय सुट्टीवर आहेत. त्या वाहक पदासाठी फीट नसल्याचे मेडिकल बोर्डाने कळविले आहे त्यामुळे त्यांची जबाबदारी बदलून ( कॅटेगरी ) दिली जाणार आहे. त्या रजेवर असतानाही प्रशिक्षण पुर्ण केल्याच्या पत्रावर त्यांची सही आहे. ही सही त्यांची नसल्याची माहिती दिली असुन बोगस सही केली आहे.

राम माने वाहक क्रमांक 9483 या वाहकाची प्रशासकीय सही मराठीत आहे असे असतानाही प्रशिक्षण पुर्ण केल्याच्या यादीत सही ही इंग्लिश आहे. प्रशिक्षण झाले नसल्याचे व ती सही त्यांची नसल्याचे त्यांनी सांगितले. प्रशिक्षण झाल्याचे व मुंबई सेंट्रलवरून फ़ोन आल्यास सर्वांनी पॉझिटिव्ह रिप्लाय द्यावा अशी सक्तीची सुचना देणारा मेसेज वाहकांच्या ग्रुपवर देण्यात आला आहे.

या संपुर्ण प्रकाराबाबत आगार प्रमुख प्रवीण भोंडवे यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले की सर्वांना एकत्र माहिती सांगितली असुन रंगीत तालीम घेतली आहे शिवाय कार्ड कसे वापरावे व इतर तांत्रिक बाबीचे व्हिडिओ व माहिती वाहक यांच्या ग्रुपवर देण्यात आली आहे. ज्यांना काही अडचण असले त्यांनी सांगावे आम्ही पुन्हा प्रशिक्षण देऊ. काही सह्या दुबार झाल्या असतील मात्र तो तितका गंभीर विषय नाही असे म्हणाले.
एकीकडे परिवहन मंत्री तथा धाराशिवचे पालकमंत्री प्रतापराव सरनाईक हे एसटी विभागात अमुलाग्र बदल करीत प्रवाशांना चांगल्या सुविधा देणेसह दर्जा व स्तिथी सुधारत असताना काही अधिकाऱ्याकडुन असे प्रकार करून हारताळ फसला जात आहे. सर्व वाहकांच्या सही व प्रशिक्षण झालेबाबत वरिष्ठ अधिकारी यांच्या मार्फत चौकशी करावी व कारवाई करावी अशी मागणी होत आहे.












