धाराशिव – समय सारथी
शहरामधील भटक्या-मोकाट कुत्र्यांचा प्रश्न तसेच पाळीव अथवा मोकाट प्राण्यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या अंत्यविधीसाठी योग्य सुविधा उपलब्ध व्हाव्यात, यासाठी जिल्हा प्रशासनाने पुढाकार घेतला आहे. जिल्हा वार्षिक योजना (सर्वसाधारण) सन २०२६-२७ अंतर्गत जिल्ह्यातील नागरी परिक्षेत्रात भटक्या – मोकाट कुत्र्यांसाठी निवारा (Dog Shelter) तयार करणे तसेच पाळीव-मोकाट प्राण्यांसाठी अंत्यविधी केंद्र उभारण्याच्या कामास पालकमंत्री प्रतापराव सरनाईक यांनी परवानगी दिली आहे.
धाराशिव,तुळजापूर,नळदुर्ग, उमरगा,मुरूम,कळंब,भूम व परंडा या आठ नगरपरिषदा,तसेच वाशी व लोहारा बु.या दोन नगरपंचायतींचा समावेश होतो.या शहरांमध्ये पाळीव प्राण्यांसाठी अंत्यविधी केंद्र उभारण्यासाठी पालकमंत्र्यांनी दिलेल्या सूचनांनुसार नगरपरिषद क्षेत्रातील उपलब्ध जागांची निश्चिती करण्यात आली आहे.
संबंधित नगर परिषदांकडून याबाबतची अंदाजपत्रके प्रशासकीय मान्यतेसाठी कार्यालयास प्राप्त झाली आहेत. यामध्ये धाराशिव येथे दोन प्रस्ताव असून,एक मोठ्या जनावरांसाठी आणि दुसरा लहान जनावरांसाठी आहे. धाराशिव येथील घनकचरा व्यवस्थापन केंद्राजवळ मोठ्या जनावरांसाठीच्या प्रस्तावाची अंदाजपत्रकीय किंमत ३ कोटी ३१ लाख ६१ हजार ५०९ रुपये,तर लहान जनावरांसाठीच्या प्रस्तावाची अंदाजपत्रकीय किंमत ३ कोटी २४ लाख ८९ हजार रुपये असून,दोन्ही ठिकाणी प्रत्येकी ५ हजार चौरस फूट जागा प्रस्तावित आहे.
तुळजापूर येथे घनकचरा व्यवस्थापन केंद्राजवळ अंत्यविधी केंद्रासाठी ३ कोटी ३१ लाख ६१ हजार ५०९ रुपये खर्चाचे अंदाजपत्रक असून,५ हजार चौरस फूट जागा प्रस्तावित आहे.नळदुर्ग येथे म्हाडा घरकुल शेजारी अंत्यविधी केंद्र उभारण्यात येणार असून,त्यासाठी ३ कोटी ३१ लाख ६१ हजार ५०९ रुपये खर्च अपेक्षित आहे.येथेही ५ हजार चौरस फूट जागा प्रस्तावित आहे.
उमरगा येथे घनकचरा व्यवस्थापन केंद्राजवळ अंत्यविधी केंद्रासाठी ३ कोटी ३१ लाख ६१ हजार ५०९ रुपये,भूम येथे घनकचरा व्यवस्थापन केंद्राजवळ ३ कोटी ३१ लाख ६१ हजार ५०९ रुपये,तर परंडा येथे घनकचरा व्यवस्थापन केंद्राजवळ ३ कोटी ३१ लाख ६१ हजार ५०९ रुपये खर्चाचे अंदाजपत्रक आहे.या तिन्ही ठिकाणी प्रत्येकी ५ हजार चौरस फूट जागा उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
प्रस्तावित सर्व कामांची एकूण अंदाजपत्रकीय किंमत २३ कोटी १४ लाख ५८ हजार ५४ रुपये आहे. मात्र मुरूम, कळंब,वाशी व लोहारा या नगरपरिषद/नगरपंचायतींमध्ये जागेअभावी सध्या ही कामे घेता आलेली नाहीत. प्राप्त अंदाजपत्रकांना सक्षम प्राधिकरणाची तांत्रिक मान्यता लवकरात लवकर घेऊन दोन्ही जिल्हा नियोजन समितीपुढे प्रस्ताव सादर करून प्रशासकीय मान्यता घेण्याची कार्यवाही करण्यात येत आहे. मोकाट-भटक्या कुत्र्यांसाठी निवारा (Dog Shelter) तयार करण्याचेही काम हाती घेण्यात आले आहे. धाराशिव,तुळजापूर,नळदुर्ग,उमरगा, मुरूम,कळंब,भूम,परंडा या आठ नगरपरिषदा तसेच वाशी व लोहारा बु.या दोन नगरपंचायतींचा यामध्ये समावेश आहे.
पालकमंत्री प्रतापराव सरनाईक यांनी दिलेल्या सूचनांनुसार धाराशिव,तुळजापूर, उमरगा,मुरूम व लोहारा बु.येथे मोकाट- भटक्या कुत्र्यांसाठी निवारा (Dog Shelter) तयार करण्यात आले आहेत. सदर कामात वाढ करणे अथवा दुरुस्ती करण्याची कामे व भूम,परंडा, कळंब,नळदुर्ग आणि वाशी येथे मोकाट- भटक्या कुत्र्यांसाठी निवारा उभारण्याची कामे घेण्यासाठी संबंधित नगरपरिषद/नगरपंचायतींकडून अंदाजपत्रके प्राप्त करून घेण्यात येत आहेत.











