धाराशिव – समय सारथी
कै पवनराजे निंबाळकर व त्यांच्या गाडीचा चालक समद काझी दुहेरी हत्याकांड प्रकरणाचा 20 जुन रोजी निकाल असुन त्यासाठी समड काझी व निंबाळकर परिवार मुंबईकडे रवाना झाला आहे. माजी गृहमंत्री डॉ पद्मसिंह पाटील यांच्यासह सर्व 9 आरोपीना कोर्टात हजर राहण्याचे आदेश कोर्टाने दिले आहेत. मुंबईतील अतिरिक्त सत्र न्यायाधीश तथा विशेष न्यायाधीश एस आर नावंदर यांच्या कोर्टात सुनावणी सुरु आहे.
आजच्या सुनावणीला पवनराजे निंबाळकर यांच्या पत्नी आनंदीदेवी, मुलगा खासदार ओमराजे, डॉ जयप्रकाश राजे तर काझी यांच्या पत्नी व मुलगा हजर राहणार असुन ते मुंबईकडे निघाले आहेत. आमच्यासाठी आजचा दिवस भावनिक क्षण असुन गेली 20 वर्ष 17 दिवस अविरत संघर्ष केला आहे, ज्या पद्धतीने निर्घृण हत्या केली ती रक्ताच्या नात्याला काळिमा फासणारी घटना आहे. आम्हाला न्यायाची अपेक्षा आहे, न्याय मिळेल अशी अपेक्षा खासदार ओमराजे निंबाळकर यांनी व्यक्त केली. डॉ जय प्रकाश राजे यांनी कायदेशीर बाबीत 20 वर्ष काम पाहत संघर्ष केला.
समद काझी यांची हत्या झाली त्यावेळी मी दीड वर्षाचा होता, त्यामुळे काही कळत नव्हते पण नंतरच्या काळात अनेक कष्ट सोसले, त्यांच्या आठवणी आई आजही सांगते अशी प्रतिक्रिया समद काझी यांच्या मुलाने दिली. लहान मुलांच्या डोक्यावरील पित्याचे छत्र हरवल्याने त्यांचा संभाळ करणेसह अन्य जबाबदाऱ्या होत्या अनेक कष्ट सोसले, समद यांचा काही दोष नसताना त्यांची हत्या करण्यात आली. दोषींना शिक्षा देऊन आम्हाला न्याय द्यावा अशी विनंती काझी परिवाराने केली.
16 जुनच्या सुनावणीवेळी डॉ पद्मसिंह पाटील हे ऍम्ब्युलन्समधुन व्हील चेअरवर आले त्यांच्या सोबत मुलगा आमदार राणाजगजीतसिंह पाटील व पृथ्वीराज पाटील होते.











