कै पवनराजे दुहेरी हत्याकांड – 9 आरोपी, 20 वर्ष, 20 जुन – आज कोर्टात ‘अशी’ प्रक्रिया व टप्पे होणार
धाराशिव – समय सारथी
कै पवनराजे निंबाळकर व त्यांच्या गाडीचा चालक समद काझी दुहेरी हत्याकांड प्रकरणाच्या 20 जुनला सुनावणी ठेवली आहे. मुख्य आरोपी राज्याचे माजी गृहमंत्री डॉ पद्मसिंह पाटील यांच्यासह सर्व 9 आरोपीना कोर्टात हजर राहण्याचे आदेश मुंबईतील अतिरिक्त सत्र न्यायाधीश तथा विशेष न्यायाधीश एस आर नावंदर यांनी दिले आहेत. तब्बल 20 वर्षानंतर हा निकाल येत असल्याने धाराशिव जिल्ह्यासह राज्याचे लक्ष लागले आहे. 20 जुनला सुरुवातीला कोर्ट दोषसिद्धी बाबत निर्णय देऊ शकते, आरोपी दोषी की निर्दोष हे जाहीर करेल नंतर दोषी आढळल्यास शिक्षा किती द्यायची यावर दोन्ही पक्षाच्या युक्तिवाद नंतर निर्णय जाहीर करू शकते.
दुहेरी हत्याकांडात डॉ पद्मसिंह पाटील हे सर्वात कमी काळ 3 महिने 19 दिवस पोलिस व न्यायालयीन कोठडीत राहिले तर सर्वाधिक काळ दिनेश तिवारी हा शुटर जेलमध्ये न्यायालयीन कोठडीत राहिला. त्याला 25 मे 2009 रोजी पारसमल जैन सोबत अटक झाल्यानंतर गुन्हा कबुल करीत न्यायाधीश महाले यांच्या कोर्टात 164 चा कबुली जबाब दिला. तिवारी हा 15 वर्ष 11 महिने कोठडीत राहिला, त्या पाठोपाठ शुटर महात्मा उर्फ पिंटू सिंग चौधरी हा 15 वर्ष 10 महिने तुरुंगात राहिला. तिवारी व चौधरी हे एप्रिल 25 मध्ये सुनावणी दीर्घकाळ चालत असल्याने जामीनावर सुटले.
माफीचा साक्षीदार बनलेला आरोपी पारसमल जैन 14 वर्ष 6 महिन्यांनी सुटला. डॉ पाटील यांना 6 जुन 2009 ला अटक झाली त्यानंतर 25 सप्टेंबर 2009 रोजी अलिबाग कोर्टाने डॉ पाटील यांना 2 लाख रुपयांच्या मुचलक्यावर जामीन मंजूर केला. डॉ पाटील सर्वात कमी काळ 3 महिने 19 दिवस पोलिस व न्यायालयीन कोठडीत राहिले.

सामान्यतः आरोपी दोषी ठरवल्यास त्यानंतर शिक्षा किती द्यायची यावर युक्तिवाद होतो. दोषी ठरविणे (Conviction) आणि शिक्षा निश्चित करणे (Sentencing) या 2 स्वतंत्र न्यायालयीन प्रक्रिया आहेत. दोष सिद्ध झालेल्या आरोपी बाबतीत सरकारी पक्ष व आरोपी यांचे वकील शिक्षेवर युक्तिवाद करतात, त्यात शिक्षेची तरतूद व किती शिक्षा द्यायची, आरोपीचे वय, आरोग्य, गुन्हेगारी पार्श्वभूमी याचा विचार कडुन शिक्षा सुनावते. ही प्रक्रिया एकाच तारखेत होते किंवा काही वेळा दोषी ठरवून पुढील तारखेस शिक्षेवर युक्तिवाद व नंतर शिक्षा सुनावली जाते, हा पुर्णपणे कोर्टाचा अधिकार असतो.
दोषी आरोपीना शिक्षा सुनावल्यानंतर अपील व पुढील कायदेशीर प्रक्रियेसाठी निकालाची प्रत विनामुल्य देते. गुन्ह्याचे स्वरूप, सहभाग, आरोपीची गुन्हेगारी पार्श्वभूमी यावरून शिक्षा व जामीन ह्या 2 गोष्टी ठरतात. आरोपी दोषी ठरून त्याला शिक्षा झाल्यास, न्यायालयीन कोठडी MCR किंवा तुरुंगातील अंडरट्रायल म्हणून घालवलेला काळ शिक्षेत समायोजित (set-off) केला जातो. जन्मठेपेच्या शिक्षेत (Life Imprisonment) set-off चा परिणाम मर्यादित असतो. अंडरट्रायल काळाची नोंद घेतली जाते, पण जन्मठेपेच्या शिक्षेची गणना सरळ वजाबाकीने होत नाही. जन्मठेप म्हणजे दोषी व्यक्तीच्या नैसर्गिक आयुष्याचा उर्वरित कालावधी. माफीच्या साक्षीदाराने सर्व बाबी उघड केल्यास, साक्ष कायम ठेवल्यास त्याला शिक्षा होत नाही.











