धाराशिव – समय सारथी
कै पवनराजे दुहेरी हत्याकांड गेली 2 दशकापासुन नेहमीच धाराशिव जिल्ह्याच्या राजकारणाच्या केंद्रस्थानी राहिले आहे. कै पवनराजे निंबाळकर यांच्या हत्येत डॉ पद्मसिंह पाटील यांना पाठबळ मिळावे यासाठी राणाजगजीतसिंह पाटील यांनी राष्ट्रवादी सोडून भाजपात प्रवेश केल्याचे बोलले जात होते त्यानंतर आता कै पवनराजे यांच्या हत्येचा निकाल बाजुने हवा असेल तर शिवसेना ठाकरे सेना सोडून शिंदे गटात जात असल्याचा आरोप खासदार संजय राऊत यांनी केला. 1 जण वडिलांच्या रक्षणासाठी तर दुसरा न्याय देण्यासाठी पक्ष प्रवेश करीत असल्याची चर्चा रंगली आहे.
कै पवनराजे व त्यांचा चालक समद काझी यांची 3 जुन 2006 रोजी हत्या झाल्यनंतर 6 जुन 2009 ला सीबीआयने खासदार डॉ पद्मसिंह पाटील यांना अटक केली. हत्या व अटकेनंतर अनेक राजकीय घडामोडी घडल्या, 20 जुन 2026 रोजी या हत्याकांडाचा निकाल अपेक्षित असुन निकालानंतर खासदार ओमराजे हे त्यांची राजकीय भुमिका जाहीर करणार आहेत.
डॉ पाटील व राणाजगजीतसिंह हे पिता पुत्र दोघेही भारतीय जनता पार्टीत सोलापूर येथे प्रवेश करणार होते मात्र वडिलांवर खुनाचा गुन्हा दाखल असल्याने त्यांना पक्षात न घेण्याचा निरोप आल्यानंतर सत्तेच्या हव्यासापोटी व स्वार्थासाठी पुत्राने वडिलांना अर्ध्या रस्त्यावर उतरवून सोलापूर गाठत भाजप प्रवेश केला. डॉ पाटील यांच्याशी पक्षांतर बाबत चर्चा झाली नाही मात्र राणा यांच्याशी झाली त्यांना मुख्यमंत्री एका प्रकरणात मदत करणार असल्याने ते स्वार्थासाठी भाजपात गेल्याचा आरोप सुळे यांनी पत्रकारांशी बोलताना केला होते.
खासदार ओमराजे यांच्यावर पवनराजे निंबाळकर हत्येच्या निकालाचा दबाव आहे, निकाल तुमच्या सारखा हवा असेल तर शिवसेना पक्षात या असा दबाव असल्याचा आरोप संजय राऊत यांनी दिल्ली येथे पत्रकार परिषदेत केला. दरम्यान पाटील व निंबाळकर यांचे पक्ष सोडण्याचे जाहीर केलेले कारण जवळपास एकच आहे.
जिल्ह्याचे प्रश्न व त्यांची सोडवणूक करण्याच्या दृष्टीने जनते बरोबर चर्चा करून राष्ट्रवादी सोडण्याचा निर्णय घेतला असे डॉ पद्मसिंह पाटील यांनी सांगितले तर सुप्रिया सुळे यांनी पक्षातील नेत्यांची आणि कार्यकर्त्यांची घेतली असती व पक्षांतर्गत कुरघोड्यांना वेळीच पायबंद घातला असता तर पक्षावर कदाचित आज ही वेळ आली नसती, असे म्हण्टले. एकंदरीत त्यांनी पवार कुटुंबाच्या कार्यपद्धतीवर थेट टीका त्यावेळी केली.
समोर सत्ता आणि पैसा आहे तर माझ्याकडे फक्त निष्ठा आहे. निष्ठा असूनही जर लोकांची कामे करता येत नसतील, तर लोकांसमोर जायचे कसे? शेवटी कोरड्या हाताने मी कधीपर्यंत फिरणार? त्यामुळे आता दुसरा पर्यायच उरत नाही, भावनिकदृष्ट्या विचार केल्यास पक्ष सोडण्याचा निर्णय हा चुकीचा वाटतो पण राजकीयदृष्या विचार केल्यास तो बरोबर आहे असे म्हणत ओमराजे हे विकासासाठी शिवसेनेला जय महाराष्ट्र करीत आहेत.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे इतके आमदार निवडून आलेले असतानाही ते शांत बसलेले नाहीत, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत त्यांनी प्रचंड मेहनत घेतली. विधान परिषदेच्या निवडणुकीतही ते स्वतः फिरत आहेत असे म्हणत त्यांनी कौतुक केले तर दुसरीकडे, प्रकृती अस्वास्थ्यामुळे उद्धव ठाकरे यांना फिरणे शक्य नाही हे मी समजू शकतो, पण किमान आदित्य ठाकरे यांनी फिरायला हवे होते. कार्यकत्यांना ताकद दिली पाहिजे होती, पण दुर्दैवाने ते झाले नाही, असे म्हणत ठाकरे कुटुंबाच्या कार्यपद्धतीवर टीका केली.











