सत्तेचं नव्हे विश्वासाचं, पदाचं नव्हे निष्ठेचं नातं – हिरक महोत्सवाच्या शुभेच्छा .. आमदार कैलास पाटील
धाराशिव – समय सारथी
राजकीय वादळं आली, सत्तेची समीकरण बदलली पण लाखो शिवसैनिकांची बाळासाहेबांवरची श्रद्धा व मातोश्री’शी जोडलेली भावनिक नाळ कधीच बदलली नाही. शिवसेना संघटना नसुन विचारांची चळवळ आहे, हे सत्तेचं नाही, तर विश्वासाचं आहे; पदाचं नाही, तर निष्ठेचं आहे अशी पोस्ट आमदार कैलास पाटील यांनी करून शिवसेनेच्या 60 व्या वर्धापन दिनास शुभेच्छा दिल्या. आमदार कैलास पाटील हे मुंबईकडे वर्धापन दिनासाठी रवाना झाले असुन ते उपस्थितीत राहणार आहेत.
हिंदुहृदयसम्राट, शिवसेनाप्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांनी मराठी माणसाच्या स्वाभिमानासाठी, महाराष्ट्राच्या अस्मितेसाठी आणि सर्वसामान्यांच्या न्याय्य हक्कांसाठी पेटवलेली शिवसेनेची मशाल आज 60 वर्षांचा गौरवशाली प्रवास पूर्ण करत आहे.. गेल्या सहा दशकांत अनेक राजकीय वादळं आली, सत्तेची समीकरणं बदलली, पदं आली आणि गेली, काही चेहरे बदलले, काही वाटा वेगळ्या झाल्या. पण एक गोष्ट मात्र कधीच बदलली नाही ती म्हणजे लाखो शिवसैनिकांची बाळासाहेबांच्या विचारांवर असलेली अढळ श्रद्धा आणि ‘मातोश्री’शी जोडलेली भावनिक नाळ.
शिवसेना ही केवळ नेत्यांची संघटना नाही; ती विचारांची, निष्ठेची आणि जनतेच्या विश्वासाची चळवळ आहे. हे नातं सत्तेचं नाही, तर विश्वासाचं आहे; पदाचं नाही, तर निष्ठेचं आहे. म्हणूनच अनेकांनी साथ सोडली, अनेकांनी मार्ग बदलला, तरी प्रत्येक संकटात शिवसैनिक मशाल हाती घेऊन खंबीरपणे उभा राहिला आणि शिवसेनेचा भगवा झेंडा अभिमानाने फडकवत राहिला..
मराठी माणसाच्या हक्कांसाठी, अन्यायाविरुद्धच्या लढ्यासाठी आणि महाराष्ट्राच्या अस्मितेसाठी पेटलेली ही मशाल आजही तितक्याच तेजाने प्रज्वलित आहे. शिवसेनेच्या या 60 वर्षांच्या वाटचालीत असंख्य शिवसैनिकांनी दिलेला त्याग, केलेला संघर्ष आणि जपलेली निष्ठा हेच पक्षाचे खरे सामर्थ्य आहे..शिवसेनेच्या हिरक महोत्सवी वर्षानिमित्त सर्व निष्ठावान आणि कट्टर शिवसैनिकांना मनःपूर्वक शुभेच्छा अशी पोस्ट आमदार कैलास पाटील सोशल मीडियावर पोस्ट करीत शुभेच्छा दिल्या आहेत.












