राष्ट्रवादी सोडून भाजपात, खा सुप्रिया सुळेंनी केले होते अनेक आरोप
धाराशिव – समय सारथी
राणाजगजीतसिंह पाटील यांनी भाजप प्रवेश केल्यानंतर त्या प्रवेशावर टीका होत कै पवनराजे हत्याकांडासह अनेक तर्क वितर्क लावले जात होते, सुप्रिया सुळे यांनी देखील काही आरोप केले त्यानंतर डॉ पाटील यांनी आरोपांचे खंडण करताना दैनिक समय सारथीकडे लेखी खुलासा केला. त्यात त्यांनी पक्ष प्रवेशाची ‘ती’ वेळ का आली आणि कशासाठी, कोणाच्या आग्रहास्तव निर्णय घेतला हे स्पष्ट सांगितले. शिवसेना खासदार ओमराजे निंबाळकर सुद्धा उद्धव ठाकरे यांची साथ सोडून पक्षांतर करण्याच्या वाटेवर आहेत, ते नेमकं कोणते कारण सांगतात हेही पाहावे लागेल.
12 सप्टेंबर 2019 रोजी दैनिक समय सारथी वृत्तपत्रात “वडिलांना अर्ध्या रस्त्यावर सोडून राणांचा भाजप प्रवेश, खासदार सुप्रिया सुळेंचा हल्लाबोल – वडिलांची कोंडी, पुत्रप्रेमापोटी पिता हतबल” मथळ्याखाली बातमी प्रसिद्ध करण्यात आली होती. डॉ पाटील व राणाजगजीतसिंह हे पिता पुत्र दोघेही भारतीय जनता पार्टीत सोलापूर येथे प्रवेश करणार होते मात्र वडिलांवर खुनाचा गुन्हा दाखल असल्याने त्यांना पक्षात न घेण्याचा निरोप आल्यानंतर सत्तेच्या हव्यासापोटी व स्वार्थासाठी पुत्राने वडिलांना अर्ध्या रस्त्यावर उतरवून सोलापूर गाठत भाजप प्रवेश केला. त्यांच्या जागी मी असते तर स्वाभिमान जपत राजकारण सोडून दिले असते, अश्या सुळे म्हणाल्या होत्या.
डॉ पाटील यांच्याशी पक्षांतर बाबत चर्चा झाली नाही मात्र राणा यांच्याशी झाली त्यांना मुख्यमंत्री एका प्रकरणात मदत करणार असल्याने ते स्वार्थासाठी भाजपात गेल्याचा आरोप सुळे यांनी पत्रकारांशी बोलताना केला होते. खा संजय राऊत यांनी ओमराजे यांच्यावर पवनराजे हत्याकांड निकालाचा दबाव आहे, निकाल हवा असेल तर आमच्याकडे या असा दबाव असल्याचे राऊत म्हणाले.
डॉ पाटील यांनी त्यानंतर लेखी खुलासा केला त्यात त्यांनी सुप्रियांनी माझ्याबद्दल आज जी काळजी व्यक्त केली आहे तीच काळजी यापूर्वी पक्षातील नेत्यांची आणि कार्यकर्त्यांची घेतली असती व पक्षांतर्गत कुरघोड्यांना वेळीच पायबंद घातला असता तर पक्षावर कदाचित आज ही वेळ आली नसती, असे म्हण्टले. वृत्त व त्यातील अनेक बाबींचे खंडन त्यांनी केले होते.
डॉ पाटील यांच्या खुलासानुसार, सुप्रिया मला मुली सारख्या आहेत. त्यांनी माझ्याबद्दल काळजी व्यक्त केली त्याबद्दल आनंद वाटला. मात्र काळजी व्यक्त करताना ती वस्तुस्थितीला धरून केली असती तर अधिक आनंद झाला असता. लोकसभा निवडणुकीनंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची राज्य व देश पातळीवर असलेली स्थिती पाहून जिल्ह्यातील राष्ट्रवादीचे नेते व कार्यकर्ते यांनी जिल्ह्याचे प्रश्न व त्यांची सोडवणूक करण्याच्या दृष्टीने जनतेबरोबर चर्चा करून पक्ष बदल करण्याचा आग्रह धरला होता व त्यानुसार आम्ही सर्वांनी मिळून हा निर्णय घेतला होता असे म्हण्टले.
1 सप्टेंबर 2019 ला राणाजगजितसिंह यांचा सोलापूर येथे केंद्रीय गृहमंत्री अमित भाई शहा यांच्या उपस्थितीत पक्ष प्रवेश ठरला होता. त्यावेळी नवीन राजकीय वाटचाल करण्यासाठी ते सोलापूरला जात असताना सर्वप्रथम आम्ही महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानीचा आशीर्वाद घेण्यासाठी गेलो होतो व तिथून पुढे ते सोलापूरला जाणार होते. त्यामुळे आई तुळजाभवानी मातेचे दर्शन घेऊन राणाजगजितसिंहाना आशीर्वाद देण्यासाठी मी तुळजापूर पर्यंत सोबत गेलो होतो.
धाराशिव शहरात 31 ऑगस्ट रोजी आयोजित करण्यात आलेल्या परिवार संवाद मेळाव्यात राणाजगजितसिंह यांना पुढील राजकीय वाटचालीस माझे आशीर्वाद असल्याचे जाहीर केले होते व उपस्थित सहकाऱ्यांना ज्या पद्धतीने आजपर्यंत तुम्ही सर्व पूर्ण ताकदीने माझ्या पाठीशी खंबिरपणे उभे राहिलात त्याच पद्धतीने यापुढे राणाजगजीतसिंहाच्या पाठीशी उभे रहा असे आवाहन केले होते.
2014 पासून मी प्रकृतीच्या कारणामुळे सक्रिय राजकारणात नाही हे पवार साहेबांसहित सर्वांना माहीत आहे. त्यामुळे माझ्या पक्षप्रवेशाचा प्रश्नच येत नव्हता आणि सोलापूरला जाण्याचा विषयच उद्भवत नव्हता. सुप्रियांना देखील हे माहीत आहे असे असताना त्यांनी ‘माझा पक्ष प्रवेश रोखला’ असं विधान करणं खेदकारक आहे. याबाबत सुप्रियांच्या कथनामध्ये काही सत्य असत तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व प्रदेश अध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी राणाजगजितसिंह यांना तरी राष्ट्रीय अध्यक्षांच्या उपस्थितीत कशाला पक्ष प्रवेश दिला असता ? असा प्रश्न केला.

2009 ते 2019 धाराशिव लोकसभा राजकीय चित्र –
2009 साली डॉ पाटील हे राष्ट्रवादी पक्षाकडुन राज्याच्या राजकारणातुन देशाच्या राजकारणात लोकसभेवर गेले त्यांनी 2009 साली शिवसेनेचे रवींद्र गायकवाड यांचा 6 हजार 787 मतांनी पराभव केला, त्यावेळी काँग्रेसच्या नेतृत्वाखालील संयुक्त पुरोगामी आघाडीचे (UPA) सरकार आले. विद्यमान खासदार असताना त्यांना 6 जुन 2009 रोजी सीबीआयने पवनराजे दुहेरी हत्याकांडात अटक केली, त्यानंतर 3 महिन्यात जामीन मिळाला. 2014 च्या लोकसभा निवडणुकीत ते राष्ट्रवादीकडुन उभे राहिले त्यांचा रवींद्र गायकवाड यांनी तब्बल 2 लाख 34 हजार मतांनी पराभव केला, त्यावेळी भाजप नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे (NDA) सरकार स्थापन होते नरेंद्रजी मोदी पंतप्रधान झाले. 2019 च्या निवडणुकीत राणाजगजीतसिंह पाटील यांनी राष्ट्रवादीकडुन निवडणूक लढवली त्यांचा ओम राजे यांनी 1 लाख 27 हजार मतांनी पराभव केला. 2019 साली भाजप 303,काँग्रेस 52, शिवसेना 18 व राष्ट्रवादीला केवळ 5 जागा मिळाल्या.













