धाराशिव – समय सारथी
कै पवनराजे निंबाळकर व त्यांच्या गाडीचा चालक समद काझी दुहेरी हत्याकांड प्रकरणाचा निकाल येण्याची शक्यता असुन कोर्टाने 20 जुनला सुनावणी ठेवली आहे. मुख्य आरोपी राज्याचे माजी गृहमंत्री डॉ पद्मसिंह पाटील यांच्यासह सर्व 9 आरोपीना कोर्टात हजर राहण्याचे आदेश मुंबईतील अतिरिक्त सत्र न्यायाधीश तथा विशेष न्यायाधीश एस आर नावंदर यांनी दिले आहेत. समाजसेवक अण्णा हजारे यांच्यासह 128 साक्षीदार यांची साक्ष झाली आहे. देशभर गजलेल्या या खटल्याचा 20 वर्षांनी लागणाऱ्या निकालाकडे लक्ष लागले आहे.
पारसमल हा या हत्याकांडाच्या ‘केंद्र’ स्थानी आहे. 1985 पासुन पोलिसांचा अधिकृत विशेष खबरी, सोने चांदी, मार्बल व्यापारी, व्यापारी संघटनेचा अध्यक्ष, कापड दुकानदार ते गुन्हेगार असा प्रवास आहे. 20 जुनच्या सुनावणीला पवनराजे निंबाळकर यांच्या पत्नी आनंदीदेवी, मुलगा खासदार ओमराजे, डॉ जयप्रकाश राजे तर काझी यांच्या पत्नी व मुलगा हजर राहणार आहेत. निकालानंतर ओमराजे राजकीय भुमिका स्पष्ट करणार आहेत त्यामुळे राजकीय दृष्ट्या हा निकाल महत्वाचा ठरणार आहे.
जैन याच्या जबाबानुसार पवनराजे यांच्या हत्येपुर्वी 16 महिने रेकी व 2 वेळा प्रयत्न केला मात्र तो असफल झाला. तो, मोहन शुक्ला व सतीश मंदाडे भेटले, त्यानंतर तो व मंदाडे डॉ पाटील यांच्या मलबार हिल येथील घरी गेले. तिथे मंदाडे व डॉ पाटील यांनी पर्सनल चेंबरमध्ये 30-35 मिनिट चर्चा केली त्यानंतर ते हॉलमध्ये आले. डॉ पाटील यांनी मला वर खाली पाहत विचारले तु कोण आहेस ? त्यानंतर मंदाडे याने सांगितले की मी डॉ पाटील यांना बोललो आहे, तु पवनराजे यांची हत्या कर. यानंतर आम्ही गाडीत बसून राकेश मारिया यांच्या कार्यालयात गेलो तिथे मारिया यांना मंदाडे याने स्कॉच बॉटल दिली. मंदाडे व त्यांना काही वयक्तिक बोलायचं असल्याने मारिया यांनी मला बाहेर थांबायला सांगितले. 20-25 मिनिट ते चेंबरमध्ये होते त्यानंतर मारिया बाहेर आले व त्यांनी मला वरून खालीपर्यंत पाहिले, नंतर आम्ही ऑफिसबाहेर आलो.
3 जून 2006 ला पवनराजे निंबाळकर व त्यांचा ड्राइवर समद काझी हे मुंबईवरून धाराशिवकडे पांढऱ्या रंगाच्या स्कोडा गाडीने येत असताना नवी मुंबई कळंबोली येथे दिवसा ढवळ्या गोळ्या घालून त्यांची हत्या करण्यात आली. पवनराजे हे झोपलेले असताना त्यांची गाडी हात दाखवुन थांबवण्यात आली त्यानंतर ड्राईव्हरने काच खाली घेताच गोळ्या झाडण्यात आल्या. प्रत्यक्षदर्शी साक्षीदार राहू नये म्हणुन समद काझी यांना सुद्धा मारण्यात आले. बंदूक फेकून दिल्यानंतर आरोपीनी पळ काढला.
पवनराजे यांच्या पत्नी आनंदीदेवी यांच्या याचिकेनंतर कोर्टाच्या आदेशाने 23 ऑक्टोबर 2008 रोजी तपास सीबीआयकडे देण्यात आला. 20 ऑगस्ट 2009 रोजी सीबीआयने माजी गृहमंत्री डॉ पाटील यांना मुख्य आरोपी करीत राजकीय द्वेषातुन हत्या झाल्याचा ठपका ठेवत 9 जणांच्या विरोधात 5 हजार पानाचे चार्जशीट सादर केले. सीबीआयचे तत्कालीन जॉईंट डायरेक्टर ऋषीराज सिंग व पोलीस अधीक्षक तथा आयपीएस अधिकारी अमिताभ ठाकुर यांची भुमिका महत्वाची ठरली. पारसमल जैनला 14 वर्षांनी व शुटर दिनेश तिवारी आणि पिंटू सिंग या 2 आरोपींना तब्बल 16 वर्षानंतर तर डॉ पाटील यांना साडे 3 महिन्यात जामीन मिळाला आहे.












